कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर देशात लॉक डाऊन (Lockdown) सुरु होते. मात्र आता यामध्ये अनेक बाबतीत शिथिलता देण्यात आली आहे. असे असले तरी पुणे (Pune) शहरामधील सार्वजनिक बस (PMPML) वाहतूक अजूनही बंद आहे. आज याबाबतच एक महत्वाचा निर्णय घेत, ही सेवा 3 सप्टेंबर पासून सुरु होत असल्याची माहिती देण्यात आली. पुणे शहरातील तसेच पिंपरी चिंचवड शहरामधील जनजीवन आता सुरळीत होताना दिसत आहे. लॉक डाऊन झाल्यानंतर आता सर्वजण आपापल्या परीने आपली नोकरी, व्यवसाय, उद्योगधंदे सुरु करत आहेत. त्या प्रकारे लोकांचे जीवन पूर्वपदावर येत आहे. मात्र शहरामधील सार्वजनिक वाहतूक सेवा अजूनही बंद आहे. याच याबाबत गेल्या काही दिवसांपासून मागणी जोर धरू लागली होती.
मुरलीधर मोहोळ ट्वीट -
'पीएमपी'ची बस वाहतूक गणेशोत्सव संपल्यानंतर सुरू होणार!
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या चार-पाच महिन्यापासून बंद असलेली 'पीएमपी' च्या बस गणेशोत्सव संपल्यावर सुरू करण्याचा निर्णय पुणे महानगरपालिका व पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या ऑनलाईन बैठकीत झाला आहे. pic.twitter.com/n62e4cxi4s
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) August 20, 2020
आज पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या 3 सप्टेंबरपासून पुण्यामध्ये महानगरपालिकेची बस सेवा सुरु होत आहे. याबाबत बोलताना मोहोळ म्हणाले की, ‘पुण्यातील सार्वजनिक वाहतूक सुरु करा, अशी मागणी नागरिक करत होते. त्या अनुषंगाने आज संचालक मंडळाच्या सदस्यांची बैठक पार पडली. यामध्ये स्थायी समितीचे अध्यक्ष, पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका महापौर, दोन्ही नगरपालिकांचे आयुक्त असे लोक सहभागी झाले होते. यामध्ये असा निर्णय घेण्यात आला की, दोन्ही शहरामधील कोरोनाचा संसर्ग पाहता, सध्या तरी गणेशोत्सवापर्यंत ही सेवा सुरु करू नये, मात्र येत्या 3 सप्टेंबरपासून पुण्यातील शहरी बस सेवा सुरु करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
मुरलीधर मोहोळ यांनी पुढे दिलेल्या माहितीनुसार, ही बस सेवा टप्प्या टप्प्याने सुरु होणार आहे. सुरुवातीला 25 टक्के म्हणजेच 421 बसेस सुरु करण्यात येणार आहेत. शहरामधील 13 डेपोंच्या 190 मार्गांवर ही बस सेवा सुरु होणार आहे. यामध्ये गर्दीची ठिकाणे किंवा जिथे बस सेवा सुरु करणे गरजेचे आहे अशा 190 मार्गांची निवड केली जाणार आहे. (हेही वाचा: प्रवाशांच्या अत्यल्प प्रतिसादात राज्यात एसटी बस आंतरजिल्हा वाहतूकीस प्रारंभ)
ही बस सेवा सुरु करताना, सामाजिक अंतराचे पूर्णतः पालन केले जाणार आहे. प्रत्येक बस मध्ये फक्त 50 टक्केच प्रवासी असणार आहेत. बस थांब्यावर लोकांना उभे राहण्यासाठी स्वतंत्र मार्किंग केले जाणार आहे. तर अशाप्रकारे कोरोनाबाबतच्या सर्व सुरक्षेच्या उपायांची अंमलबजावणी करत अखेर पुण्यातील बस सेवा सुरु होत आहे.