Ajit Pawar | (File Photo)

पुण्यामध्ये एका मोठ्या बांधकाम व्यावसायिकाला राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या मोबाईल क्रमांकाचा वापर करत धमकावल्याचा प्रकार समोर आला आहे. अ‍ॅपचा गैरवापर करून हा प्रकार केल्याचं समोर आलं आहे. अजित पवार यांचे पीए चौबे बोलत असल्याचं सांगत आरोपींनी 20 लाखांची खंडणी देखील मागितली. सध्या या प्रकरणामध्ये बंडगार्डन पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल असून आरोपींनी खंडणी मागितल्या प्रकरणी सहा जणांना अटक झाली आहे.

पुण्यात बिल्डरला अ‍ॅपद्वारा अजित पवारांचा क्रमांक भासवत त्यांचा पीए बोलत असल्याचं सांगण्यात आले. हवेली तालुक्यातील वाढे बोल्हाई मधील शिरसवडी येथील जमिनीसंदर्भातील वाद मिटवून टाका, असे खोटे सांगून वाद मिटविला नाही तर तुम्हाला गावात पाऊल ठेवू देणार नाही, तुमचा कोणताही प्रकल्प होऊ देणार नाही, अशी धमकी देखील देण्यात आली. त्यानंतर बिल्डरकडे 20 लाखांची खंडणी मागितली आणि बिल्डरनेही दिलेले 2 लाख आरोपींनी घेतले. 13 जानेवारीपासून हा धमक्यांचा फोन कॉल प्रकार सुरू आहे. हे देखील नक्की वाचा: Pune Shocker: अल्पवयीन मुलीचे खाजगी फोटो Instagram वर पोस्ट करण्याची धमकी दिल्याप्रकरणी मुंबई मध्ये एका किशोरवयीन मुलाला अटक .

बिल्डरने एका क्षणी बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत तक्रार दाखल केली. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात आयपीसी कलम 384, 386, 506, 34 आयटी ॲक्ट कलम 66 (सी), (डी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. नवनाथ भाऊसाहेब चोरामले (वय २८, रा. हवेली), सौरभ नारायण काकडे (वय २०, रा. हडपसर), सुनिल ऊर्फ बाळा गौतम वाघमारे (वय २८, रा. हवेली), किरण रामभाऊ काकडे (वय २५) चैतन्य राजेंद्र वाघमारे (वय १९, रा. भेकराईनगर, फुरसुंगी) आणि आकाश शरद निकाळजे (वय २४, रा. हवेली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.