Bomb Threat | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Pune School News: शाळांमध्ये बॉम्ब ठेवल्याच्या धमक्या आणि अफवा काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. बावधान परिसरातील एका खासगी शाळेत बॉम्ब (Pune Bomb Threat) ठेवल्याचा ई-मेल (Bomb Threat E-mail) पिंपरी चिंचवड आयुक्तालयास मध्यरात्री उशीरा प्राप्त झाला. काही प्रसारमाध्यमांनी हा ईमेल- सदर शाळेच्या मुख्याद्यापकांना आज (13 फेब्रुवारी) सकाळी प्राप्त झाल्याचेही म्हटले आहे. ज्यामुळे संपूर्ण पुणे शहरात खळबळ उडाली आहे. पुणे पोलीस (Pune Police) तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून, बॉम्ब शोधक पथकास पाचारण करण्यात आले आहे. दरम्यान, अद्याप तरी बॉम्बसदृश्य कोणतीही वस्तू परिसरात आढळून आली नसल्याचे वृत्त आहे.

नागरिकांनी निर्भय रहावे- पोलीस

प्राप्त माहितीनुसार, बावधान येथील एका खासगी शाळेत बॉम्ब ठेवल्याची धमकी ईमेल आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर बॉबशोधक पथक आणि पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी केलेल्या तपासात अशी कोणतीही वस्तू आढळली नसल्याने सर्वांनीच सुटकेचा निश्वास टाकला. तसेच, अशा प्रकारचे मेल अनेकदा येतअसतात. नागरिकांननी घाबरुन जाऊ नये तसेच काळजी करण्याचे कारण नसल्याचेही पोलिसांनी म्हटले आहे. आलेला मेल नेमका कोणी केला याबाबत शोध सुरु असल्याचेही पोलिसांनी म्हटले आहे.

जोधपूर येथेही धमकी

दरम्यान, पुणे येथील शाळेत बॉम्ब ठेवल्याचा ईमेल प्राप्त झाल्याची घटना उघडकीस येण्यापूर्वी जोधपूर येथेही असाच प्रकार पाहायला मिळाला. जोधपूर येथील एम्सच्या संचालकांना आरडीएक्सद्वारे कॅम्पसमध्ये आत्मघातकी बॉम्बस्फोटाची धमकी देणारा ईमेल मिळाला. हा संदेश मिळताच घाबरलेल्या एम्स प्रशासनाने ताबडतोब बसनी पोलिस ठाण्याच्या पोलिसांना कळवले. त्यानंतर एम्समध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. दोनदा तपासणी केल्यानंतरच मुख्य इमारतीत प्रवेश करण्याची परवानगी देण्यात आली. दरम्यान, बॉम्ब शोधक पथकाने केलेल्या तपासणीत असा कोणताही प्रकार आढळून आला नसल्याने ही केवळ अफवा असून, ईमेलमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे पुढे आले. (हेही वाचा, Ahmedabad Bomb Threat: जेद्दाह-अहमदाबाद विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी, सफाई कर्मचाऱ्यांना सापडला होता धमकीचा संदेश)

पुणे आणि जोधपूरच्या घटनेपूर्वी केरळ पोलिसांनाही काल (12 फेब्रुवारी) त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर बॉम्बची धमकी मिळाली, ज्यामध्ये दावा करण्यात आला की, नेदुम्बासरी येथील तिरुवनंतपुरम सेंट्रल रेल्वे स्टेशन आणि कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळावर 32 तासांच्या आत स्फोट घडवून आणण्यात येणार आहे.