Pune: ED आणि SFIO च्या नावाखाली ज्वेलर्सकडे 50 लाखांची मागणी करणाऱ्या 4 जणांना अटक
Fraud । Representational Image | (Photo Credits: IANS)

पुणे (Pune) शहरातील एका नामवंत ज्वेलर्सकडून 50 लाख रुपये खंडणी घेण्याच्या आरोपाखाली 4 जणांना अटक करण्यात आली आहे. सौरभ गाडगीळ असे या पीडित ज्वेलर्सचे नाव आहे. अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate) आणि गंभीर फसवणूक अन्वेषण (Serious Fraud Investigation) यांच्या नावाखाली या ज्वेलरकडून 50 लाख रुपये उकळण्यात आले. हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या रिपोर्टनुसार, ही घटना 22 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजता घडली. यानंतर गाडगीळ यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे आरोपी रुपेश चौधरी, अमित मीरचंदानी, विकास भल्ला आणि संतोष राठोड यांना विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपींविरुद्ध आयपीसी कलम 385, 387, 506 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या ज्वेलरी फर्मने एका खाजगी फायनान्स कंपनीकडून लोन घेतले आहे, असे आरोपींनी गाडगीळ यांना भासवले. तसेच या ज्वेलर्सच्या सर्व आर्थिक व्यवहारांमध्ये घोटाळा देखील दिसून येत आहे, असे देखील आरोपींनी सांगितले. ही सर्व बाब दाबून टाकण्यासाठी त्यांनी ज्वेलर्सकडून 50 लाखांची मागणी केली.

पीएनजी ग्रुपमधील एका कंपनीने डीएचएफएलकडून 68 कोटी रुपयांचे लोन घेतले आहे. या लोनची माहिती दाखवत हे लोन ज्वेलरी फर्मने घेतले असल्याचे गाडगीळ यांना भासवले. तसेच हे लोन घेताना यामध्ये आढळून आलेल्या गैरव्यवहारांबद्दल देखील त्यांनी गाडगीळ यांना प्रश्न विचारले.

आयकर विभाग आणि ईडी यांनी या लोनची दखल घेतली असून त्यासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दिल्लीमधील एक ईडी अधिकारी हे प्रकरण सांभाळत असून ते सेटलमेंटसाठी काही पैसे मागत आहेत, असे भल्ला यांनी गाडगीळ यांना सांगितले. सेटलमेंट न केल्यास काय होईल, याची भीती चौधरी यांनी गाडगीळ यांना दाखवली. या सर्व प्रकारानंतर पीडित ज्वेलर्सने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली आहे.