Sanjay Raut यांच्या विरोधात Privilege Motion Notice; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक आमदार संजय शिरसाट यांचे विधानसभा अध्यक्षांना पत्र
Sanjay Raut | (PC - ANI)

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) गटाचे समर्थक आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी शिवसेना (UBT) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या विरोधात हक्कभंगाची (Privilege Motion) नोटीस दिली आहे. आमदार शिरसाट यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल (Assembly Speaker) नार्वेकर (Rahul Narwekar) यांना विशेषाधिकार भंग झाल्याची नोटीस मंगळवारी दिली. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये बंड केल्यापासून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे समर्थक यांच्यात जोरदार वाद सुरु आहे. हा वाद कोर्टाच्या दारात गेला. कोर्टाचा निकाल एकनाथ शिंदे यांना दिलासा देणारा ठरला. मात्र, राज्यापाल, विधानसभा अध्यक्ष आणि सरकार स्थापणेच्या अनुशंघाने घडलेल्या अनेक घटना कायद्याच्या कक्षेत अवैध ठरवल्या. त्यामुळे या सरकारवर हे सरकार बेकायदेशीर असल्याचा ठपका आल्याचे पाहायला मिळते आहे.

संजय राऊत आणि संजय शिरसाट यांच्यात आरोप-प्रत्यारोप

संजय शिरसाट यांनी दाखल केलेल्या हक्कभंग नोटीसमध्ये म्हटले आहे की, खासदार संजय राऊत हे विधानसभा अध्यक्षांवर दबाव आणून सरकारला घटनाबाह्य ठरवू पाहात आहेत. शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे (यूबीटी) पक्षाचे नेते असलेल्या संजय राऊत यांनी अनेक वेळा म्हटले आहे की, महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार हे बेकायदेशीर आहे आणि ते संविधानाच्या विरोधात आहे. गुरुवारीही त्यांनी याचा पुनरुच्चार केला. (हेही वाचा, Rahul Narvekar On MLAs Disqualification: आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णयाआधी शिवसेना कुणाची चा निवाडा करावा लागणार - राहुल नार्वेकर)

निर्णय कायद्याच्या आदारेच होईल- राहुल नार्वेकर

दुसऱ्या बाजूला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटले आहे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील 16 शिवसेना आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय मी कायद्याच्या आधारे घेणार आहे. आपणाकडून कोणत्याही दबावाखाली निर्णय घेतला जाणार नाही. महाराष्ट्र सरकारच्या 16 आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणात निकाल देताना विधानसभा अध्यक्षांना विशेष अधिकार देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे मी स्वागत करतो, असेही नार्वेकर यांनी पुढे म्हटले. आमदारांच्या अपात्रतेबद्दल आपण योग्य तो निर्णय लवकरात लवकर घेईन. पण आपण कोणत्याही स्थितीत घाईगडबडीत निर्णय घेणार नाही.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटले आहे की, आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात निर्णय घेण्यासाठी जेवढा वेळ लागेल तेवढा वेळ आपण घेऊ. कोणाच्याही दबावाखाली निर्णय घेणार नाही. मी कायद्यानुसार निर्णय घेईन. कोर्टाला निर्णय घ्यायला 10 महिन्यांहून अधिक काळ लागला आहे. याकडेही नार्वेकर यांनी लक्ष वेधले. दरम्यान, उद्धव ठाकरे गटाकडून कोणताही अर्ज आला नसल्याची माहिती नार्वेकर यांनी दिली. शिवाय 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेताना कोणताही भेदभाव केला जाणार नाही, असे ते म्हणाले. तत्पूर्वी, अध्यक्ष नार्वेकर यांनी महाराष्ट्र विधान भवनातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली.