Prahlad Modi  On GST: नरेंद्र मोदी यांचे बंधू प्रल्हाद मोदी म्हणतात 'मागण्या पूर्ण होईपर्यंत जीएसटी भरणे बंद करा'
Prahlad Modi | (Photo Credits: ANI)

पंतप्रधान नरेद्र मोदी यांचे बंधू (PM Narendra Modi's Brother) प्रल्हाद मोदी (Prahlad Modi) यांनी विविध मागण्यांवर आंदोलन करत व्यापारी आणि व्यावसायिकांच्या आक्रोशाला आवाज दिला आहे. प्रल्हाद मोदी यांनी म्हटले आहे की, जोपर्यंत तुमच्या मागण्या मान्य होत नाही. तोपर्यंत वस्तुस सेवा कर (Goods and Services Tax) म्हणजेच जीएसटी (GST) भरणे बंद करा. सरकारविरोधात आंदोलन करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या बाजूने बोलत प्रल्हाद मोदी यांनी म्हटले की, नरेंद्र मोदी असो किंवा इतर कोणी असो, त्यांना आपले ऐकावेच लागेल. देशभरातील सुमारे 6.50 लाख रेशन दुकानदारांचे आपण प्रतिनिधित्व करतो असाही प्रल्हाद मोदी दावा करतात.

प्रल्हाद मोदी हे ऑल इंडिया फेयर प्राइस शॉप एसोसिशन (All-India Fair Price Shop Association) चे उपाध्यक्ष आहेत. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधूही आहेत. त्यांनी सांगितले की, व्यापाऱ्यांनी केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार विरोधात आवाज तीव्र केला आहे. ठाणे येथे आंदोलन करणाऱ्या व्यापाऱ्यांना मार्गदर्शन करताना मोदी म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: तुमच्या दरवाजावर आले पाहिजेत. त्यासाठी आगोदर व्यापाऱ्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहायला हवे की, आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही जीएसटी देणार नाही. आम्ही लोकशाही देशात राहतो. गुलामीत नाही.

प्रल्हाद मोदी हे ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर येथील व्यापाऱ्यांशी बोलत होते. या वेळी बोलताना ते म्हणाले, कोरोना महामारी (COVID-19 pandemic) आणि ऑकडाऊनमुळे व्यापारी आगोदरच संकटात आहे. उल्हासनगर, अंबरनाथ, ठाणेसह अनेक ठिकाणच्या व्यापाऱ्यांसोबत संवाद साधत त्यांनी म्हटले की, कोरोना महामारी निर्बंधांचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली अनेक व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे सर्व गुन्हे परत घेतले पाहिजेत. व्यापारी आगोदरच अनेक अडचणींमुळे अडचणीत आहे. ऑनलाईन शॉपिंगमुळे सर्वांनाच मोठा फटका बसला आहे. या सर्वांवर सरकारने वेळीच उपाययोजना करायला हवी असेही ते म्हणाले.