Pm Narendra Modi (Photo Credit - Twitter)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. याशिवाय पीएम मोदी गोव्यालाही जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात 75,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करणार आहेत. नागपूर आणि बिलासपूरला जोडणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवतील. पंतप्रधान कार्यालयाने (PMO) दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपुरात एम्सचे उद्घाटनही करणार आहेत. याशिवाय नागपूर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान मोदी करणार आहेत. यादरम्यान पंतप्रधान मोदी नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याची पायाभरणी करणार आहेत.

त्याचवेळी ते नागपूर आणि शिर्डीला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करणार आहेत. दरम्यान, पंतप्रधान मोदी शहरात नव्याने बांधलेले एम्स राष्ट्राला समर्पित करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी विदर्भातील एका सार्वजनिक कार्यक्रमात 1,500 कोटी रुपयांच्या रेल्वे प्रकल्पांचे लोकार्पण करणार आहेत. PM मोदी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वन हेल्थ (NIO) आणि नाग नदी प्रदूषण निवारण प्रकल्पाची पायाभरणीही करणार आहेत. हेही वाचा Indian Railway: रेल्वेचं तत्काळ तिकीट बुक करायचं आहे? या सोप्या टिप्स वापरत करा झटपट रेल्वे तिकीटाचं बुकींग

याशिवाय ते सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल्स इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी (सीआयपीईटी) आणि हिमोग्लोबिनोपॅथी संशोधन, व्यवस्थापन आणि नियंत्रण केंद्राचे उद्घाटन करतील. PM मोदी आज सकाळी 9.40 वाजता नवी दिल्लीहून नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचतील आणि नंतर शहरातील रेल्वे स्थानकावर जातील, जिथे ते वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील.

दुसरीकडे पंतप्रधान मोदी गोव्यातील मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटनही करणार आहेत. हा विमानतळ सुमारे 2870 कोटी रुपये खर्चून विकसित करण्यात आला आहे. नोव्हेंबर 2016 मध्ये पंतप्रधान मोदींनी या विमानतळाची पायाभरणी केली होती.