धक्कादायक! मुलाचा कर्करोग बरा करून देण्याच्या बहाण्याने मांत्रिकाचा शास्त्रज्ञाच्या पत्नीवर बलात्कार
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: ANI)

मुंबई: भारताने शिक्षण क्षेत्रात कितीही प्रगती केली तरी अंधश्रद्धा, कर्मकांड यांचे प्रस्थ आजही दिसून येते. परिस्थितीसमोर माणूस इतका हतबल होतो की, नैतिक विचार करण्याची त्याची क्षमताच खुंटून जाते आणि यातूनच फोफावत जाते ती म्हणजे गुन्हेगारी. मुलाचा कर्करोग बरा करून देतो असे सांगून एका मांत्रिकाने एका उच्चशिक्षित महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आश्चर्य म्हणजे या पत्नीचा नवरा एक शास्त्रज्ञ आहे. सोबतच या मांत्रिकाने महिलेकडून लाखो रुपयेदेखील घेतले आहेत. शेवटी हा प्रकार असह्य झाल्याने या महिलेने तिच्या नवऱ्याला सर्वकाही सांगितले, त्यानंतर दोघांनी पोलिसांकडे तक्रार केल्यावर पोलिसांनी या मांत्रिकाला अटक केली आहे.

हे दाम्पत्य चेंबूर येथे वास्त्यव्यास आहेत. त्यांच्या एकुलत्या एका मुलाला 2017 मध्ये कर्करोगाचे निदान झाले. याबाबत अनेक उपचार करूनही मुलगा बरा नाही म्हणून, या आईने एका मांत्रिकाची भेट घेतली. त्याने विशिष्ट मंत्रसिद्धीने मुलगा बरा होऊ शकतो असे आश्वासन महिलेला दिले. त्यानंतर महिलेच्या घरी जाऊन यज्ञ करून, महिला व मुलास पवित्र राख प्राशन करण्यास सांगितले. त्यानंतर दोघेही बेशुद्ध झाले. शुद्धीवर आल्यानंतर मुलाचा आजार बरा करावा म्हणून मी हे केले असे सांगून, साठ हजार रुपयांचे दागिने घेऊन तो निघून गेला. (हेही वाचा: 12 वर्षाच्या मुलीवर 60 वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाकडून बलात्कार)

त्यानंतर त्याने या महिलेला आपल्या अंधेरीच्या घरात बोलावले व पूजेचा एक भाग आहे असे सांगून बलात्कार केला. या कृत्याचे त्याने व्हिडीओ चित्रिकरण केले व फोटो काढले. त्याआधारे तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. दरम्यान त्याने या महिलेकडून जवळजवळ तीन लाख रुपयेही उकळले. मुलाच्या मृत्युनंतरही हा प्रकार सुरूच राहिला, त्यानंतर हे सर्व असह्य झाल्याने या महिलेने पतीला सर्व काही सांगितले. पोलिसांकडे तक्रार केल्यावर पोलिसांनी या मांत्रिकावर बलात्कार, खंडणी, धमकावणे, जादुटोणाविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.