उद्धव ठाकरे, प्रशांत किशोर यांच्यात 'मातोश्री'वर चर्चा?, सत्तास्थापनेपूर्वी शिवसेनेच्या गोटात खलबतं
Uddhav Thackeray, Prashant Kishor | (Photo Credit: Archived, edited, representative images)

Assembly Election Results 2019: विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर शिवसेना पक्षाच्या गोठात जोरदार हालचाल सुरु आहे. सत्तेवर येणाऱ्या सरकारमध्ये शिवसेना किंगमेकर ठरणार आहे. त्यामुळे कोणत्याही पक्षाला सरकार स्थापन करायचे असेल तर, शिवसेनेला सोबत घेतल्याशिवाय गत्यंतर नाही. या पार्श्वमीवर प्रसिद्ध राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी मुंबई येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतल्याचे वृत्त आहे. उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी ही भेट पार पडल्याचे वृत्त आहे.

दरम्यान, प्रशांत किशोर आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीतील तपशील बाहेर आला नाही. तसेच,  या भेटीबद्दल अधिकृत दुजोराही मिळू शकला नाही. दरम्यान,  एबीपी माझा या वृत्तवाहिनीने या भेटीबाबत याबाबत वृत्त दिले आहे. प्रशांत किशोर हे सध्यास्थितीत भारतीय राजकारणातील मोठे राजनितीकार असल्याचे मानले जाते.

विधानसभा निवडणूकीत भाजप 105, शिवसेना 56, राष्ट्रवादी काँग्रेस 54 , काँग्रेस 44 आणि इतर पक्षांना 29 जागा मिळाल्या. या निकालामुळे भाजपला मोठा धक्का बसला. भाजपचे नेते विधानसभा निवडणुकीत 200 पेक्षा अधिक जागा सहज जिंकू असे म्हणत होते. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडूनही तसा दावा केला जात होता. पण, जनतेने भाजपच्या दाव्याला टाचणी लावली. जनतेने युतीला पुन्हा सत्ता दिली. मात्र, विरोधकांनाही प्रबळ बनवले. (हेही वाचा, गळ्यात घड्याळ हातात कमळ, शिवसेनेच्या वाघाची व्यंगचित्रातून डरकाळी; संजय राऊत यांच्याकडून हटके ट्विट)

निवडणूक निकालामुळे शिवसेनेचा भाव चांगलाच वधारला आहे. शिवसेना किंगमेकर असल्याचे पाहून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांनी शिवसेनेला पाठींबा देत सरकार स्थापन करण्यास अनुकुलता दर्शवली आहे. दोन्ही पक्षांनी थेट आपला निर्णय दिला नसला तरी, त्या दृष्टीने मतप्रदर्शन नक्कीच केले आहे. त्यामुळे शिवसेना काय निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे आहे.