विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष आपला पक्ष किती श्रेष्ठ आहे हे दाखवण्यासाठी ठिकठिकाणी प्रचार सभांचा धडाका चालू ठेवलाय. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) शेगाव येथील प्रचार सभेत भाजपवर (BJP) निशाणा साधत दोन्ही काँग्रेस पक्षांवर देखील जाहीर टीका केली आहे. 'भाजपचा घोडा सध्या उधळला आहे. त्याला लगाम घालण्यास दोन्ही काँग्रेस अपयशी ठरली आहे. भाजपच्या या उधळलेल्या घोड्याला वंचित बहुजन आघाडीच लगाम घालून वठणीवर आणेल' अशी घणाघाती टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शेगाव येथील प्रचार सभेत केली.
वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार किसन चव्हाण यांच्या प्रचारासाठी आले असता प्रकाश आंबेडकर यांनी भाजपबरोबर दोन्ही काँग्रेसवर (Congress) घणाघाती टीका केली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी दरम्यान आघाडी झाली असली तरी राष्ट्रवादीकडून (NCP) पाडापाडीचं राजकारण सुरू आहे. काँग्रेसच्या उमेदवाराला पाडण्यासाठी राष्ट्रवादी विरोधी उमेदवारांना मदत करत असल्याचा दावाही आंबेडकरांनी केला.
हेदेखील वाचा- 'मला ईडीची भीती दाखवू नका; ईडीला 'येडी' बनवून टाकीन'- शरद पवार
यावेळी आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार दौऱ्याची खिल्ली उडवली. पंतप्रधान मोदी सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होत असून त्यांच्या दौऱ्यामुळे आता आकाशातही वाहतुक कोंडी होऊ लागली आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
भाजपला सत्ता राबवता येत नाही. केवळ धर्माचा आधार घेत ते राज्या चालवत आहेत. देशाचे अर्थकारण बिघडले आहे. स्वत:च्या फायद्यासाठी त्यांनी अनेक बँका बुडविल्या असून येत्या पाच वर्षात आणखी पाच बँका बुडणार असल्याचा दावाही त्यांनी केला.
महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण 288 जागांसाठी 21 ऑक्टोबर (सोमवारी) रोजी मतदान होणार असून त्यासाठी 8 कोटी 95 लाख 62 हजार 706 मतदारांची नोंदणी झाली आहे. महाराष्ट्रात एकूण 95,473 मतदान केंद्रं असून 1.8 लाख ईव्हीएमचा मतदानासाठी वापर होणार आहे.