बीएमसीच्या Pothole Challenge 2019 मध्ये खड्ड्यांसाठी अधिकाऱ्यांना त्यांच्या खिशातून द्यावे लागणार 500 रूपये
Potholes in Mumbai (Photo Credit: IANS)

मुंबईला खड्डेमुक्त करण्यासाठी बीएमसीने आज (1 नोव्हेंबर) पासून Pothole Challenge 2019 सुरू केलं आहे. या चॅलेंजमध्ये मुंबईकरांना शहरातील खड्डे पालिका प्रशासनाला दाखवायचे आहेत. ते 24 तासामध्ये बुजवले न गेल्यास पालिका 500 रूपये देणार आहे. मात्र हे पैसे पालिकेच्या तिजोरीतून नव्हे तर थेट पालिका अधिकार्‍यांच्या खिशातून जाणार असल्याचे बीएमसी आयुक्त प्रविण परदेशी यांनी सांगितल्याचे मटाच्या वृत्तामध्ये सांगण्यात आले आहे.

खड्डे दाखवा 500 रूपये कमवा या पालिकेच्या अजब चॅलेंजचा आज रवी राजा यांनी निषेध केला. स्थायी समितीच्या बैठकीत पालिकेच्या या योजनेवर बोलताना प्रविण परदेशी यांनी खुलासा केला आहे. मुंबईकरांना बक्षीसाच्या स्वरूपात दिले जाणारे पैसे हे पालिका तिजोरीमधून नव्हे तर पालिकेच्या रस्ते विभागातील कार्यकारी अभियंता, वॉर्डातील सहाय्यक आयुक्त आणि रस्त्याच्या दोष दायित्व कालावधीतील कंत्राटदार यांना भरावे लागणार आहेत. BMC चं मुंबईकरांना Pothole Challenge 2019! पालिकेच्या MyBMC Pothole FixIt App वर 'खड्डे दाखवा, 500 रुपये मिळवा'चं आव्हान.

पालिकेने दिलेल्या चॅलेंजनुसार तक्रार आल्यानंतर 24 तासांमध्ये खड्डा बुजवला न गेल्यास संबंधित व्यक्तीला 500 रूपये मिळणार आहेत. त्यानुसार पालिकेने आर्थिक तरतूद केली आहे का? असा प्रश्न रवी राजा यांनी विचारला होता. त्यावर पालिका आयुक्तांनी खुलासा केला आहे.

दरम्यान पावासाळ्यात दरवर्षी मुंबईकर खड्ड्यांमुळे हैराण झाले आहेत. खड्ड्यांमुळे रस्स्त्यांची चाळण झाल्याने ट्राफिक पासून अपघातांपर्यंत अनेक समस्यांचा मुंबईकरांना सामना करावा लागत आहे.