महाराष्ट्रात परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना मदत मिळावी या मागणीसाठी कॉंग्रेस शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेणार
Balasaheb Thorat | (Photo Credit: Facebook)

महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून परतीचा पाऊस आणि क्यार चक्रीवादळ यांनी धुमाकूळ घातला आहे. या परतीच्या पावसाने कोकणासह राज्यातील विविध भागात शेतक-यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. भात, कापूस, सोयाबीन, कांदा, द्राक्ष या पिकांसह फळबागाचेही मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतक-यांना मदत द्यावी. या मागणीसाठी काँग्रेस पक्षाचे शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी दिली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली व अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत आज टिळक भवन येथे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक पार पडली.

आज कॉंग्रेसच्या बैठकीला देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव व हिमाचल प्रदेशच्या प्रभारी रजनीताई पाटील, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व तामिळनाडूचे प्रभारी संजय दत्त, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आ. डॉ. नितीन राऊत, आ. यशोमती ठाकूर, मुझफ्फर हुसेन, आ. डॉ. विश्वजीत कदम, विधानपरिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे, आ. विजय वडेट्टीवार, खा.बाळू धानोरकर, किसान काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष नाना पटोले, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव अमित देशमुख, वर्षा गायकवाड, संपतकुमार, सोनल पटेल, बी. एम. संदीप, चेला वामशी रेड्डी, विधीनपरिषदेतील काँग्रेस गटनेते शरद रणपिसे, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड, खा. हुसेन दलवाई, माजी मंत्री चंद्रकात हंडोरे, के. सी, पडवी, आ. सुनिल केदार, आ. अमिन पटेल, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, एनएसयुआयचे प्रदेशाध्यक्ष आमिर शेख, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत, मोहन जोशी, रामकिशन ओझा आदी उपस्थित होते.

कॉंग्रेसच्या बैठकीत निवडणूक निकालासह परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतक-यांच्या नुकसानीबद्दल चर्चा करण्यात आली. राज्यात अद्यापही पाऊस सुरु असल्याने शेतक-यांच्या हाता तोंडाशी आलेले खरीप पूर्णपणे वाया गेले आहे. कापूस, सोयाबीन, कांदा, द्राक्ष बागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोकणातील भात शेती उद्धवस्त झाली आहे. फळबागांसह पशुधनाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेल्या वर्षी दुष्काळात होरपळेला शेतकरी सावरण्यापूर्वीच तो ओल्या दुष्काळाचा सामना करत आहे. त्यामुळे परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीचे सरकारने तात्काळ पंचनामे करावेत व शेतक-यांना भरीव आर्थिक मदत द्यावी या मागणीसाठी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचे शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेणार आहे. सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे राज्यातील उद्योग धंदे अडचणीत आले आहेत. बेकारी वाढली आहे. त्याविरोधात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीन देशभरात 5 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर दरम्यान आंदोलन करण्यात येणार आहे. त्याबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली. राहुल गांधी ध्यानसाधनेसाठी ऑक्टोबर महिन्यात दुसर्‍यांदा परदेशात; खालावलेल्या आर्थिक स्थितीवरून कॉंग्रेसची देशव्यापी आंंदोलनाची तयारी.

31 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता टिळक भवन दादर मुंबई येथे काँग्रेसच्या नवनिर्वाचीत आमदारांची बैठक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.