राहुल गांधी ध्यानसाधनेसाठी ऑक्टोबर महिन्यात दुसर्‍यांदा परदेशात; खालावलेल्या आर्थिक स्थितीवरून कॉंग्रेसची देशव्यापी आंंदोलनाची तयारी
Rahul Gandhi | Photo Credits: Twitter/ ANI

लोकसभा आणि महाराष्ट्र, हरियाणा विधानसभा निवडणूकीनंतर सत्तेमध्ये आलेल्या भाजपा सरकार विरोधी आंदोलन करण्यासाठी कॉंग्रेस पक्ष तयार आहे. मोदी सरकारला आर्थिक मंदीसाठी जबाबदार धरत कॉंग्रेसने देशव्यापी आंदोलन करण्याची तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस नेते राहुल गांधी सध्या ध्यानधारणेसाठी परदेश दौर्‍यावर गेले आहेत. दोन दिवसांपूर्वीच राहुल गांधी परदेशी रवाना झाल्याने आज सांगण्यात आले आहे. पुढील आठवड्याभरासाठी राहुल गांधी ध्यानसाधनेसाठी भारताबाहेर असतील अशी माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीपूर्वीदेखील राहुल गांधी कंबोडियामध्ये ध्यानसाधनेसाठी गेले आहेत अशी माहिती कॉंग्रेस पक्षाकडून देण्यात आली होती. त्यामुळे ऑक्टोबर 2019 मधील ध्यानसाधनेसाठी राहुल गांधी यांचा हा दुसरा परदेश दौरा आहे. यावरून राहुल गांधींवर भाजपाकडून टीका देखील केली जात आहे.

कसं असेल कॉंग्रेस पक्षाचं देशव्यापी आंदोलन?

भारताच्या बिकट आर्थिक व्यवस्थेवर कॉंग्रेस पक्षाकडून मोदी सरकारचा निषेध करण्यात येणार आहे. यासाठी 1 ते 8 नोव्हेंबर दरम्यान 35 प्रेस कॉंफरंस म्हणजेच पत्रकार परिषदांचं आयोजन करण्यात आलं आहे. या माध्यमातून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तर 5 ते 15 नोव्हेंबर दरम्यान याच मुद्द्यावरून देशव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. कॉंग्रेस पक्षाचे प्रवक्ता रणदीप सिंह सुरजेवाला यांनी आज दिल्लीत आयोजित एका पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली आहे.

पुढील आठवड्यात राहुल गांधी भारतामध्ये परतल्यानंतर या कार्यक्रमाची सविस्तर रूपरेषा बनवली जाणार आहे. त्यामध्ये राहुल गांधी यांचादेखील सक्रिय सहभाग असेल.