
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून (Pooja Chavan Suicide Case) संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. याप्रकरणावरून शिवसेना आणि भाजप यांच्यातील आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरु आहे. याप्रकरणी कोंडीत सापडलेले संजय राठोड यांनीही वनमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता पूजाच्या कुटुंबातच वाद उफाळल्याचे दिसत आहे. पूजाच्या वडील लहूदास चव्हाण यांनी तिच्या चुलत आजी शांताबाई राठोड यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पूजाच्या पालकांनी पैसे घेऊन तोंड बंद केले आहे, असा आरोप शांताबाई यांनी केला होता. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ माजली.
“पूजा चव्हाणच्या घटनेत तिचे आई वडील अद्यापही काहीच बोलत नाही. त्या दोघांना संजय राठोड यांच्याकडून पाच कोटी रुपये देण्यात आले आहेत. त्याबाबतचे पुरावे माझ्याकडे आहेत. योग्यवेळी ते पुरावे समोर आणणार आहे. तसेच मी या प्रकरणी भूमिका मांडत असल्याने माझ्या जीवालाही धोका असल्याचे शांताबाई राठोड प्रसार माध्यमांसमोर म्हणाल्या आहेत. परंतु, शांताबाई यांनी केलेले आरोप पुजाच्या वडिलांनी फेटाळून लावले आहेत. तसेच शांताबाई यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. हे देखील वाचा-Pooja Chavan Suicide Case: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी कोडींत सापडलेल्या वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा
संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक विषयांवर चर्चा केली. त्यावेळी त्यांनी पूजा आत्महत्या प्रकरणावरही भाष्य केले आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे म्हणाले की, पूजाचे आई-वडिल आणि बहिण उद्धव ठाकरे यांना भेटल्याचे त्यांनी सांगितले. या भेटीत त्यांनी उद्धव ठाकरे यांना एक पत्र दिले होते. पूजा चव्हाण प्रकरणात होणारी आमची व आमच्या समाजाची बदनामी थांबवावी, अशी मागणी पूजाच्या आईवडिलांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.