नाशिक: मालेगाव मधील पोलिस उपनिरीक्षकाने पोलिस स्टेशनमध्येचं झाडली स्वत:वर गोळी; आत्महत्येचं कारण अस्पष्ट
Suicide | Image Use For Symbolic Purposes Only | (Photo Credits: PixaBay)

नाशिकमधील (Nashik) मालेगाव (Malegaon) येथील पोलिस उपनिरीक्षकाने (Police Sub Inspector) पोलिस ठाण्यातचं स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अजहर शेख असं या पोलिस अधिकाऱ्यांचं (Police Officer) नाव आहे. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

प्राप्त माहितीनुसार, अजहर शेख यांनी स्वत:च्या सर्व्हिस रिव्हाल्वरने गोळी झाडून आत्महत्या केली आहे. शनिवारी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. शेख यांच्या आत्महत्येचे नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र, कौटुंबिक वादातून त्यांनी आत्महत्त्या केल्याची चर्चा सध्या पोलिस ठाण्यात सुरू आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस करत आहेत. (हेही वाचा - Coronavirus: ठाणे येथील महाराष्ट्र पोलीस कर्मचाऱ्याची कोरोना व्हायरसची चाचणी पॉझिटिव्ह)

दरम्यान, आज नाशिकमध्ये एका 31 वर्षीय तरुणाने कोरोनाच्या भीतीतून आत्महत्या केली आहे. प्रतीक कुमावत, असं या तरुणाचं नाव आहे. प्रतीकने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईडनोट लिहून ठेवली होती. यात त्याने आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची भीती व्यक्त करत आत्महत्या करत असल्याचं म्हटलं होतं. नाशिक जिल्ह्यातील या दोन घटनांमुळे खळबळ उडाली आहे.