Indian Rupee | Image used for representational purpose only | (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक (Maharashtra Assembly Elections 2019) रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आली असताना नागपूर पोलिसांना तब्बल 1 कोटी रुपयांचे घबाड हाती लागले आहे. नागपूर (Nagpur) पोलिसांनी पाचपावली (Panchpaoli) येथून 75 लाख तर सिताबर्डी (Sitabuldi) येथून 25 लाख रुपयांची रोखड जप्त केली आहे. पाचपावली येथील रक्कम पोलिसांनी एका कारच्या डीकीतून हस्तगत केली. तर, उर्वरीत 25 लाखाची रक्कम ओला कारमधून जात असलेल्या दोन व्यक्तींकडील बॅगमधून हस्तगत करण्यात आली. नागपूर पोलिसांनी मंगळवारी सकाळी ही कारवाई केली.

प्राप्त माहितीनुसार, इतक्या मोठ्या रकमेचा मालक नेमका कोण याबाबत माहिती मिळू शकली नाही. ही रक्कम पक्षनिधी होती की, निवडणूक काळात वापरण्यासाठी कोणा उमेदवाराने ही रक्कम आणली होती याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. पोलिसांनी ही रक्कम ताब्यात घेतली असून, पुढील तपास सुरु केला आहे. मात्र, एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणावर रक्कम सापडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

दरम्यान, महाराष्ट्र पोलिसांनी या आधीही राज्यातील विविध भागांतून मोठ्या प्रमाणावर रक्कम हस्तगत केली आहे. या वेळी निवडणूक काळात पहिली रोकड मुंबईतून हस्तगत करण्यात आली. गेल्या काही दिवसांतच जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात चोरवड चेक पोस्ट नाक्यावरून पोलिसांनी 29 लाख 15 हजार रुपयांची रोकड जप्त केली आहे. बसमधील एका प्रवाशाकडून पोलिसांनी ही रक्कम जप्त केली होती. (हेही वाचा, मुंबई: निवडणूक आयोगाकडून धारावी विधानसभा मतदारसंघात 8.17 लाख रूपयांची रोकड जप्त)

निवडणूक आयोगाने पैशाचा गैरव्यवहार टाळण्यासाठी राज्यभरात भरारी पथकाची स्थापना केली आहे. त्यासाठी क्विक रिस्पॉन्स टीम तयार करण्यात आली असून, त्याला आयकर विभागाच्या कंट्रोल रुमची उभारणी करण्यात आली आहे. पैशाचा गैरव्यवहार टाळण्यासाठी मतदार किंवा इतर नागरीकही या कंट्रोल रुमला प्रतिसाद देऊ शकतात. तसे अवाहनही आयकर विभागाने केले आहे.