धक्कादायक! पोलीस स्टेशनमध्ये साजरा केला गेला गुन्हेगाराचा वाढदिवस; 5 पोलिसांचे निलंबन
वाढदिवस साजरा करत असताना पोलीस (संग्रहित संपादित प्रतिमा)

गुन्हेगारांचे चोचले पुरवणारे अनेक पोलीस अधिकारी याआधी निलंबित झाले आहेत. मात्र अजूनही असे प्रकार चालूच आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबई (Mumbai) येथील भांडूप परिसरातील पोलीस स्टेशनचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये पोलीस गुन्हेगाराचा वाढदिवस साजरा करताना दिसत आहे. त्यानंतर या व्हिडीओबाबत अनेकांनी कमेंट करून आपला राग व्यक्त केला होता. आता या घटनेबाबत कडक कारवाई करत, भांडुप पोलिस स्टेशनचे तीन पोलिस उपनिरीक्षक आणि दोन पोलिस हवालदार यांना निलंबित करण्यात आले आहे.

23 जुलै रोजी आयान खानचा या आरोपीचा वाढदिवस होता. हा आरोपी पोस्को गुन्हा अंतर्गत तुरुंगात आहे. याचा वाढदिवस पोलिसांनी साजरा केला होता. या व्हिडीओमध्ये पोलीस त्याला केक भरवतानाही दिसत आहेत. त्यानंतर अप्पर पोलिसांकडून याबाबत कारवाई करण्यात आली. सचिन कोकरे, पंकज शेवाळे, घोसाळकर, गायकवाड आणि जुमले अशी निलंबित झालेल्या पोलिसांची नावे आहेत. (हेही वाचा: न्यायालयातून जेलमध्ये परतत असताना पोलिसांना दारू पार्टी देऊन कुख्यात गुंड पसार)

पोलीस ठाण्याच्या 4 थ्या मजल्यावर हा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना केक भरवताना, गळाभेट देत शुभेच्छा देतानाचे व्हिडीओ, फोटो आयाननेच व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्सला ठेवल होते. त्यानंतर हे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. याआधी आयानविरुद्ध खंडणी, मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत. मात्र त्यातील एकाही प्रकरणात आरोपपत्र दाखल झालेले नाही. यावरून हा गुन्हेगार पोलिसांच्या अगदी जवळचा असल्याचे लक्षात येत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर झोन सातचे पोलिस आयुक्त अखिलेश सिंह यांनी तात्काळ कारवाई केली करत.