विधानसभा निवडणुका (Maharashtra Assembly Elections) तोंडावर आल्या आहेत. यासाठी सर्वच पक्षांचा जोरदार प्रचार चालू आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची प्रचारसभा बीडच्या परळी (Parli) येथे पार पडली. मात्र या सभेला गालबोट लागावे अशी घटना घडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परळीतील सभेच्या बंदोबस्तासाठी गेलेल्या पोलिसांच्या गाडीला अपघात झाला आहे. परळी येथील सभेसाठी बीड येथून दंगल प्रतिबंधक पथक गेले होते. सभा संपवून परतताना सिरसाळा येथे हा अपघात झाला. यामध्ये 15 पोलीस जखमी झाले आहेत. त्यांना जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून उपचार चालू आहेत.
पीएम नरेंद्र मोदी यांच्या परळी येथील सभेसाठी पोलिसांचा ताफा बीड वरून आला होता. सभा संपल्यानंतर हे दंगल प्रतिबंधक पथक परत बीडला जाण्यासाठी निघाले असता, सिरसाळा येथे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी खड्ड्यात गेली. या झालेल्या अपघातात साधारण 15 पोलीस जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. जखमींना माजलगाव, बीड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. (हेही वाचा: बुलढाण्यात काँग्रेस पक्षाचे चिन्ह असलेला टी-शर्ट घालून 21 वर्षीय तरुणाची आत्महत्या)
या अपघातानंतर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे तातडीने घटनास्थळी पोहचले व त्यांनी बचावकार्य सुरु केले. या अपघातामध्ये 5 जणांची अवस्था गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.