मुंबईत नाइट लाईफ (Mumbai Night Life) येत्या 26 जानेवारीपासून सुरु होणार आहे, असे पर्यटनमंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी जाहीर केले. परंतु, या निर्णयास गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी असमर्थता दर्शवली आहे. रविवारी अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी ते म्हणाले की, मुंबई नाइट लाइफ सुरु करण्यासाठी पोलिसांची तयारी असणे आवश्यक आहे. महत्वाचे म्हणजे, यासाठी पोलिसांनी अद्याप तयारी केलेली नाही. त्यामुले येत्या 26 जानेवारीपासून नाइट लाइफला सुरुवात होईल हे सांगता येणे कठीण आहे. तसेच ही संकल्पना चांगली आहे. येत्या 22 जानेवारी रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर निर्णय अपेक्षित आहे, असेही अनिल देशमुख म्हणाले आहेत.
पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे हे नाइट लाइफ आग्रही असून शिवसेनेच्या ताब्यातील मुंबई महापालिकेने सन 2016 मध्ये यासंबंधीच्या पस्तावास मान्यता दिली आहे. दरम्यान, अनिल देशमुख यांनी मुंबई नाइट लाइफ संदर्भात माहिती दिली आहे. नाइट लाइफ सुरु करण्याबाबत पोलिसांची अद्याप पाहणी सुरू आहे. त्यांच्या तयारीचा आढावा घेण्यात येईल. राज्य मंत्रिमंडळातही अद्याप त्यावर चर्चा झालेली नाही. 22 जानेवारी रोजी त्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत येणार आहे. त्यानंतर गृह विभाग व संबंधित विभागांच्या तयारीचा आढावा घेण्यात येईल. त्यानंतरच यास मंजुरी दिली जाऊ शकते, असे अनिल देशमुख यांनी अयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले आहे. हे देखील वाचा-मुंबई: आधुनिक तंत्रज्ञानासह पुन्हा एकदा नव्याने सक्रिय होणार पोलिसांचे अश्वदल
नाइट लाइफबाबतच्या निर्णयात मुंबईतील दुकाने आणि मॉल 24 तास खुले ठेवण्यास परवानगी दिली जाणार आहे. प्रायोगिक तत्त्वावरील हा प्रयोग मुंबईतील अनिवासी भागांत सुरू केला जाणार आहे. मद्यविक्रीवर सध्याप्रमाणेच म्हणजे मध्यरात्री दीडनंतर प्रतिबंध असेल. याप्रस्तावाला भाजप नेते अशिष शेलार यांनी विरोध दर्शवला आहे. निवासी भागात पब आणि लेडीज बार 24 तास सुरु ठेवण्यास भाजपचा विरोध राहील असे शेलार यांनी जाहिर केले आहे.