Pod Hotel (संग्रहित संपादित प्रतिमा)

दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे शहरातील आणखी एक पॉड हॉटेल (Pod Hotel) विकसित केले जात आहे. हे हॉटेल या महिन्याच्या अखेरीस लोकांसाठी खुले होण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वेच्या (CR) अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली. कॅप्सूल हॉटेल म्हणूनही ओळखले जाणारे हे पॉड हॉटेल, महानगरातील अशी दुसरी सुविधा असेल. यापूर्वी, 17 नोव्हेंबर 2021 रोजी, पश्चिम रेल्वेच्या (WR) मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी पॉड हॉटेल उघडण्यात आले होते.

सीएसएमटीच्या मुख्य मार्गावर (बाहेरच्या ट्रेन टर्मिनस) वेटिंग रूमजवळ पॉड हॉटेल विकसित होत आहे आणि त्याची क्षमता 50 लोक असेल, असे अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले. या हॉटेलमध्ये दोन लोकांच्या क्षमतेचे चार फॅमिली पॉड असतील आणि 30 सिंगल पॉड्सही असतील. पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र वॉशरूम आणि शॉवर रूम याशिवाय प्रवाशांसाठी सामान ठेवण्यासाठी खोली असेल.

मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले की, स्लीपिंग पॉड्सचा विकास आणि ऑपरेशनचे कंत्राट नमह एंटरप्रायझेसला देण्यात आले आहे, जे रेल्वेला दरवर्षी 10, 07,786 रुपये परवाना शुल्क देईल. रेल्वेला 55.68 लाख रुपयांचा महसूल मिळेल. या कराराद्वारे परवानाधारक सीएसएमटी येथे 131.61 चौरस मीटरवर स्थानकावर येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांसाठी आरामदायी राहण्यासाठी सर्व आधुनिक सुविधांसह पॉड विकसित करेल. (हेही वाचा: लवकरच महाराष्ट्रात बंद होऊ शकते दारूची होम डिलिव्हरी; गृह विभागाने लिहिले उत्पादन शुल्क आयुक्तांना पत्र)

सध्या या पॉड हॉटेलचे बरेच काम झाले असून, ते या महिन्याच्या अखेरीस प्रवाशांसाठी खुले केले जाण्याची शक्यता आहे. भारतीय रेल्वेचे पहिले पॉड हॉटेल मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सुरू केले होते. यात क्लासिक पॉड्स, प्रायव्हेट पॉड्स, महिलांसाठी आणि दिव्यांग प्रवाशांसाठी स्वतंत्र पॉड्ससह 48 कॅप्सूल सारख्या खोल्या आहेत.

दरम्यान, सीएसएमटी हे देशातील सर्वात व्यस्त रेल्वे स्थानकांपैकी एक आहे, ज्या ठिकाणी दररोज लाखो प्रवाशांची ये-जा होत असते. त्यामुळे या ठिकाणच्या पॉड हॉटेलला प्रवाशांना नक्कीच फायदा होईल अशी अशा व्यक्त केली जात आहे.