Liquor | Image used for representational purpose | (Photo Credit: Wikimedia Commons)

राज्यामध्ये गेल्या काही महिन्यांच्या तुलनेत आता कोविड-19 (Covid-19) प्रकरणांमध्ये घट होत असल्याने महाराष्ट्रात लवकरच दारूची होम डिलिव्हरी (Home Delivery of Liquor) बंद केली जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी सांगितले. राज्य सरकारने यापूर्वी कोविड-19 लॉकडाऊनमुळे दारूच्या होम डिलिव्हरीला परवानगी दिली होती. यामध्ये फक्त परवानाधारक दारू दुकानांनाच दारू पोहोचवण्याची परवानगी देण्यात आली होती. आता राज्याच्या गृह विभागाने महाराष्ट्र उत्पादन शुल्क आयुक्तांना पत्र लिहून दारूची होम डिलिव्हरी होणार नाही, असे पत्र दिले आहे.

कोरोना विषाणूमुळे राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आले होते. या दरम्यान अनेक गोष्टी ठप्प झाल्या होत्या. याचा थेट परिणाम सरकारच्या तिजोरीवर झाला. त्यावेळी काही नियमांमध्ये बदल करत, तसेच मद्य व्यावसायिकांना दिलासा देत राज्य सरकारने दारूची होम डिलिव्हरी सुरु केली होती. गर्दी टाळण्यासाठी आणि सामाजिक अंतर राखले जावे म्हणून सरकारने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले होते. मात्र आता कोरोना विषाणू रुग्णांमध्ये घट होत आहे तसेच जनजीवन सुरुळीत होत आहे, म्हणून सरकार आपला निर्णय मागे घेत दारूची होम डिलिव्हरी बंद करत आहे.

मात्र, सर्व कायदेशीर आणि सामाजिक घटकांचा विचार करूनच सरकार याबाबत निर्णय घेईल, असे उत्पादन शुल्क विभागाने म्हटले आहे. त्याचबरोबर उत्पादन शुल्क आयुक्तांच्या निर्देशापर्यंत किरकोळ विक्रेते दारूची होम डिलिव्हरी सुरू ठेवतील. किती दारू घरपोच दिली जात आहे याची कोणतीही ठोस आकडेवारी उपलब्ध नसली तरी, साथीच्या रोगाचा उद्रेक झाल्यापासून लाखो लोकांनी घरपोच दारू मागवायला सुरुवात केली आहे. (हेही वाचा: मुंबईत प्लास्टिक बंदीविरोधात BMC कडक, उल्लंघन करणाऱ्यांना दंडासह तुरुंगात पाठवणार)

याबाबत वर्ल्ड ऑफ वाईन चेनचे मालक भावेश पटेल म्हणाले की, त्यांच्याकडे नरिमन पॉइंट येथील एका स्टोअरमध्ये 9,500 ग्राहकांचा होम डिलिव्हरी डेटाबेस आहे. ते म्हणाले की जर दारूची होम डिलिव्हरी थांबली तर हजारो डिलिव्हरी आणि आयटी कर्मचाऱ्यांना नोकऱ्या गमवाव्या लागतील. ते पुढे म्हणाले की, आमचे दुकान कुलाबा ते अंधेरीपर्यंत दररोज सरासरी 150 डिलिव्हरी करते. आजच्या पिढीला तंत्रज्ञानाची जाण आहे आणि रांगेत उभे राहण्याऐवजी ते ऑनलाइन खरेदी करणे पसंत करतात. ऑनलाइन शॉपिंगमध्ये त्यांना एकाच प्लॅटफॉर्मवर अनेक पर्याय मिळतात, त्यामुळे होम डिलिव्हरी बंद झाली तर त्याचा परिणाम व्यवसायावर होऊ शकतो.