संपूर्ण देशावर ओढावलेले कोरोना व्हायरसचे (Coronavirus) संकट महाराष्ट्रात (Maharashtra) अधिक गहिरे होऊ लागले आहे. राज्यातील रुग्णवाढ कायम असून बळींचा आकडाही वाढत आहे. राज्यातील मुंबई (Mumbai) शहारात कोरोना बाधितांची संख्या अधिक आहे. त्यामुळे साहजिकच सर्वच यंत्रणावरील ताण आणि जबाबदारी जास्त आहे. दरम्यान आपली जबाबदारी चोख बजावण्यात तरबेज असणाऱ्या मुंबई महिला पोलिसांनी अजून एक धाडसाचे काम केले आहे. शाहुनगर (Shahu Nagar) पोलिस ठाण्याच्या पोलिस नाईक संध्या शीलवंत (PN Sandhya Sheelvant) यांनी चार बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत. हे चारही मृतदेह सायन हॉस्पिटलमधील (Sion Hospital) होते. यामुळे मुंबई पोलिस दलाची मान अभिमानाने उंचावली असून ट्विटरच्या माध्यमातून संध्या शीलवंत यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला आहे.
संध्या शीलवंत यांचे कौतुक करताना मुंबई पोलिसांनी लिहिले, "संसाराचा भार पेलणाऱ्या रणरागिणीने मुंबईचे संकट लीलया खांद्यावर घेतले आणि मुंबई पोलीस दलाची मान उंचावली, शाहूनगर पोलीस ठाण्याच्या पो. नाईक संध्या शीलवंत यांनी चार बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करुन धाडस आणि धैर्याचे दर्शन घडविले. आम्हास तिचे कौतुक वाटते..."
Mumbai Police Tweet:
संसाराचा भार पेलणाऱ्या रणरागिणीने मुंबईचे संकट लीलया खांद्यावर घेतले आणि मुंबई पोलीस दलाची मान उंचावली, शाहूनगर पोलीस ठाण्याच्या पो. नाईक संध्या शीलवंत यांनी चार बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करुन धाडस आणि धैर्याचे दर्शन घडविले. आम्हास तिचे कौतुक वाटते...
— Mumbai Police (@MumbaiPolice) May 22, 2020
कोरोना व्हायरसच्या गंभीर संकटात मुंबई पोलिस अविरतपणे कार्य करत आहेत. अनेक हल्ले पचवून काम करणाऱ्या कर्तव्यदक्ष पोलिसांवर देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. संध्या यांनी दाखवलेल्या धाडसाला तोड नाही. जबाबदारीचे भान राखत कर्तव्य बजावणाऱ्या संध्या शीलवंत यांना सलाम.
महाराष्ट्रातील तब्बल 1177 पोलिसांना कोरोना व्हायरसची लागण झाली असून त्यातून 473 पोलिस उपचारानंतर बरे झाले आहेत. तर 1666 पोलिसांवर अद्याप उपचार सुरु आहेत. दरम्यान 16 पोलिसांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.