पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या कर्मचार्‍यांना यंदा दिवाळी बोनस मिळणार; महापौर मुक्ता टिळक यांची माहिती
दिवाळी बोनस Photo Credit : IANS)

मुंबईमध्ये बेस्ट कर्मचारी वेतनवाढीच्या मागणीसाठी आग्रही असताना पुण्यामध्ये पीएमपी (PMP) म्हणजेच पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या कर्मचार्‍यांसाठी दिलासा देणारी मोठी घोषणा करण्यात आली आहे. पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांनी दिलेल्या माहितीनुसार पीएनपी सुमारे 10 हजार 200 कर्मचार्‍यांना दिवाळीत बोनस देणार आहेत. संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये या महत्त्वपूर्ण निर्णयावर चर्चा झाली असून महापालिका आर्थिक तरतूद करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

पीएमपी कर्मचार्‍यांसाठी संचालक मंडळाने केलेल्या तरतूदीमुळे यंदा कर्मचार्‍यांचा दिवाळ सण मोठ्या उत्साहात साजरा होण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसातच महाराष्ट्र विधानसभा निवडणूकांच्या तारखा जाहीर होणार आहेत. त्याच्यासोबत आचारसंहिता लागू होणार आहे. परिणामी पीएमपी कर्मचार्‍यांना सानुग्रह अनुदान म्हणजेच बोनस देण्यामध्ये अडचण निर्माण होण्याची शक्यता होती. मात्र आता वेळीच निर्णय घेतल्याने पीएमपी कर्मचार्‍यांचा यंदा दिवाळी बोनसचा मार्ग मोकळा झाला आहे. ही कर्मचार्‍यांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक 2019 च्या आचारसंहितेपूर्वी आवश्यक मान्यता घेण्यात येतील असे देखील पुणे महापौर मुक्ता टिळक यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. कर्मचार्‍यांच्या बोनसची रक्कम देण्याची प्रक्रिया देखील लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल असे पुणे महानगर पालिका स्थायी समिती अध्यक्ष सुनील कांबळे यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता विधानसभा निवडणूकींच्या तोंडावर सुरू असलेल्या घोषणांचा पाऊस सुरू झाला आहे.