PMC Bank (Photo Credits: IANS)

पंजाब अॅन्ड महाराष्ट्र ऑपरेटिव्ह बँक (PMC) घोटाळाप्रकरणी लाखो खातेधारकांची आयुष्यभराची जमा केलेली रक्कम अडकली आहे. हजारो लोकांवर बेघर होण्याचे संकट ओढावले आहे. पण बँकेला डबघाईला घालणाऱ्या संचालकांची मात्र विदेशात कोट्यावधी रुपयांची संपत्ती असल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. यामध्ये ईडीकडून (ED)  मनी लॉन्ड्रिंग अंतर्गत अधिक तपास केला जात आहे. तसेच आर्थिक नुकसान केल्याबाबत मुंबई पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे. बँकेने केलेल्या या घोटाळ्यामागील मुख्य कारण म्हणजे, एकच ग्रुप HDIL च्या कंपन्यांना एकूण 73 टक्के दिल्याने झाले आहे.

तर पीएमसी बँकेचे संचालक राकेश- सारंग वाधवान यांची दुबई आणि लंडन येथे अपाम संपत्ती असल्याची बाब समोर आली आहे. लंडन येथे आलिशान बंगला असून त्यावर आता जप्ती आणण्यासाठी न्यायालयाच्या माध्यमातून लेटर ऑफ रोगेटरी जाहीर करण्याच्या प्रयत्नात आहेत. मुंबई आणि आसपासच्या संपत्तीवर ही जप्ती आणण्याची कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत ज्या संपत्तीवर जप्ती आणली आहे त्यामधील पालघर जिल्ह्यातील वसई येथे 5 एकर जमिनीवर विशाल विला, अलिबाग येथे बंगला, 2 रॉल्स रॉयस आणि एक बेंटली कारसह अन्य 6 आलिशान गाड्या आहेत. एवढेच नाही तर मॉरिशस येथे समुद्र किनारी एक याट् असून त्यावरही जप्ती आणण्याचा प्रयत्न सुरु आहे.(PMC बॅंकेच्या खातेदारांकडून माजी व्यवस्थापकाचा निषेध; 'वरयाम सिंह चोर है' अशा दिल्या घोषणा)

आतापर्यंत 60 कोटी रुपयांच्या दागिन्यांवर जप्ती आणली आहे. एचडीआयएलचे संचालकच नाही तर पीएमसी बँकेचे चेअरमॅन वरियम सिंह यांनी सुद्धा प्रचंड संपत्ती बनवली आहे. असे सांगण्यात येत आहे की, UK आणि USA या दोन्ही ठिकाणी बंगले आहेत. आणि कॅनडा येथे एक हॉटेल असून ते मुलाच्या नावावर आहे. माजी एमडी जॉय थॉमस यांचे 4 फ्लॅट पुण्यात असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे आता अधिक कसून चौकशीसह तपासणी करण्यात येत आहे.