Viksit Bharat Sankalp Yatra | (Photo Credits: X)

केंद्र सरकारने (Central Government) घेतलेले निर्णय, योजना आदींची माहिती घरोघरी पोहोचविण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा (Viksit Bharat Sankalp Yatra) सुरु करण्यात आली आहे. ही यात्रा सरकारी अधिकारी गावखेड्यांपर्यंत घेऊन जात आहेत. मात्र, या यात्रेस नागरिकांचा प्रचंड विरोध होऊ लागला आहे. विकसित भारत संकल्प यात्रेच्या आडून पंतप्रधान नरेंद्र मोद यांचाच प्रचार केला जाऊ लागल्याने नागरिक संतप्त आहेत. अशा वेळी प्रशासकिय अधिकाऱ्यांना गावपतळीवर नागरिकांचा संताप, विरोध आणि वादावादीला सामोरे जावे लागते आहे. या पार्श्वभूमीवर सरकारी कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत या यात्रेतून मोदींचा प्रचार करण्यास नकार दिला आहे. परभणी (Parbhani) जिल्ह्यातील आठ विस्तार अधिकाऱ्यांनी याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाला एक पत्रही लिहिल्याचे समजते.

विकसित भारत संकल्प यात्रेस नागरिकांचा विरोध

काही गावांमध्ये विकसित भारत संकल्प यात्रेचे स्वागतही केले जात आहे. मात्र, काही ठिकाणी नागरिक आक्रमक भूमिका घेत या यात्रेला विरोध करत आहेत. इतकेच नव्हे तर काही ठिकाणी अधिकाऱ्यांवरही प्रश्नांची सरबत्ती केली जात आहे. त्यामुळे प्रशासकीय पातळीवरही मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, ' परभणीच्या (Parbhani) आठ विस्तार अधिकाऱ्यांनी याबाबत जिल्हाधिकारी यांना पत्र लिहून थेट भारत संकल्प यात्रेच्या कामकाजाला नकार दिला आहे'. गावकऱ्यांमध्ये सरकारविरोधात संताप आहे. या संतापाचा सामना कारणाशिवाय प्रशासकीय कर्मचाऱ्यांना करावा लागत असल्याने या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण पाहायला मिळत आहे. (हेही वाचा, PM Narendra Modi To Visit Ayodhya Today: पंतप्रधन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत विमानतळ, नवीन रेल्वेगाड्यांचे आज उद्घाटन; जाणून घ्या संपूर्ण तपशील)

सरकारी कर्मचाऱ्यांमध्येही नाराजी

विकसित भारत संकल्प यात्रा प्रचारासाठी गावोगावी दाखल होत असलेल्या वाहनांवर 'मोदी सरकारची हमी' असे उल्लेख असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटोही आहेत. त्यामुळे ही योजना नेमकी कोणाची आहे? असा सवाल नागरिकांना पडला आहे. काही गावांमध्ये तर नागरिक विचारत आहेत ही योजना सरकारीच असेल तर आमचा त्याला विरोध नाही. पण, मोदी सरकारीच हमी हा काय प्रकार आहे? मोदी म्हणजे भारत सरकार आहे काय? तुम्ही मोदींचा प्रचार करत आहात काय? असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे. या प्रश्नांवरुन गावकरी आणि थेट विरोध करताना दिसून येत आहे. याबाबत सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणावर व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

विकसित भारत संकल्प यात्रा प्रचार रथावर फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो आणि 'मोदी सरकारची गॅरेंटी' असेच थेट उल्लेख आहेत. त्यामुळे नागरिकांना हे प्रचार रथ एखाद्या राजकीय पक्षाचे आहेत की सरकारचे याबाबतही संभ्रम आहे. सोबतच, ही योजना केंद्र सरकारची असेल तर त्याचा उल्लेख भारत सरकार अथवा केंद्र सरकार असा केला जावा. केवळ मोदींचाच उदो उदो का केला जातो आहे, असाही सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.