Eknath Shinde, Narendra Modi, Devendra Fadnavis | (Photo Credit - Twitter)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi Mumbai Visit) यांचा मुंबई दौरा नुकताच पार पडला. या दौऱ्यात त्यांनी मुंबई मेट्रो 7 व '2 अ' विस्तारीत मार्गाचे गुंदवली मेट्रो स्थानकावर लोकार्पण केले. राज्य सरकार आणि भारतीय जनता पक्षाकडून या दौऱ्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. या तयारीचाच एक भाग म्हणून वाहतूक व्यवस्थापन करण्यासाठी मेट्रो 1 (Mumbai Metro) काही काळ बंद ठेवण्यात आली. परिणामी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याचा नागरिकांना आणि सुमारे 55 हजार मेट्रो प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. पंतप्रधानांच्या या दौऱ्यामुळे अनेकांना मनस्तापही झाला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई मेट्रो 7 व '2 अ' च्या विस्तारीत मार्गासाठी लोकार्पण करणयासाठी गुंतवली मेट्रो स्थानकात गुरुवारी (19 जानेवारी) रोजी आले होते. गुंदवली मेट्रो स्टेशन हे मेट्रो 1 स्थानकाशी लगत आहे. त्यामुळे मेट्रो 1 ला मेट्रो 2 वरुन येता येते. पण, लोकार्पणाच्या कार्यक्रमासाठी मेट्रो 1 मार्गावरील सेवा सायंकाळी 2 तास बंद ठेवण्यात आली होती. ज्यामळे या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या अनेक नागरिकांचा खोळंबा झाला. अनेकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. सायंकाळी 4.45 ते 7.30 या कालावधीत मेट्रो 1 सेवा घाटकोपर ते वर्सोवा आणि वर्सोवा ते घाटकोपर स्थानकांदरम्यान बंद राहिली. (हेही वाचा, PM Narendra Modi Mumbai Visit: 'स्वातंत्र्यानंतर प्रथमच भारत मोठी स्वप्ने पाहण्याची आणि ती पूर्ण करण्याचे धाडस करत आहे'- मुंबईमध्ये पीएम नरेंद्र मोदी)

मेट्रो 1 वरुन अंधेरी, साकीनाका, मरोळ व असल्फा स्थानकादरम्यान सर्वाधिक प्रवासी प्रवास करतात. हे सर्व प्रवासी सकाळी घाटकोपरवरुन मोठ्या प्रमाणावर निघतात. तर सायंकाळी वर्सोवाकडून घाटकोपरसाठी ही मेट्रो मेट्रो अंधेरीपासून मरोळ, साकीनाका, असल्फावरून भरत येते. सायंकाळच्या वेळी सरकारी आणि खासगी कार्यालये सुटत असल्याने मेट्रो स्थानकावर प्रचंड गर्दी पाहायला मिळते. दरम्यान, सायंकाळच्या वेळी मेट्रो बंद राहिल्याने 8.30 पासून पुढच्या सर्व मेट्रोवर प्रवाशांचा ताण पडला. सर्व मेट्रो भरभरुन येऊ लागल्या.