Crop | Representational image (Photo Credits: pxhere)

PM Crop Insurance Maharashtra: सर्व्हर डाऊन झाल्याने म्हणा किंवा वेळ न मिळाल्याने म्हणा. जर तुम्ही अद्यापही पीक विमा हप्ता भरला नसेल तर तुमच्यासाठी संधी चालून आली आहे. केंद्र सरकारने पीक विमा भरण्यासाठी तीन दिवसांची मुदत आणखी वाढवून दिली आहे. खरेतर आज 31 जुलै रोजी ही मुदत संपत होती. मात्र, त्यात केंद्राने पुन्हा वाढ दिल्याने आता तुम्हाला हा हप्ता 3 ऑगस्ट पर्यंत भरता येणे शक्य होणार आहे. त्यामुळे अद्यापही तुम्ही त्या बाजूला फिरकला नसाल तर आता तिकडे वळायला काहीच हरकत नाही. अनेक शेतकऱ्यांना पीक विमा भरताना अडचणी आल्या होत्या. राज्यातील अनेक ठिकाणी सर्व्हर डाऊन असल्याने हा विमा त्यांना भरता आला नव्हता. अनेक शेतकऱ्यांनी तशा तक्रारीही केल्या होत्या. त्यामुळे राज्य सरकारने केंद्राकडे ही मुदत वाढ वून मिळावी अशी विनंती केली होती. ज्याला यश आले आहे. शेतकऱ्यांना ऑनलाईन फॉर्म भरताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यातील शेतकऱ्यांची स्थिती पाहता अनेकदा ते सीएससी सेंटरवर पिक विमा भरण्यासाठी चकरा मारत पण कधी वीज नसणे तर कधी विज असणे पण सर्व्हर डाऊन असणे, अशा एक ना अनेक कारणांमुळे त्यांना पीकविमाच भता येत नव्हता. परिणामी अनेक शेतकरी पिकविमा भरण्यापासून वंचित राहिले होते. यंदा केवळ एक रुपयांमध्ये पीक विमा भरला जात आहे. त्यामुळे असंख्य शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत. असे असले तरी पीकविमा न भरलेल्या शेतकऱ्यांची संख्याही कमी नव्हती. त्यातच पीकविमा भरण्याची शेवटची तारीख जवळ येत असल्याने शेतकऱ्यांची घालमेल वाढली होती. त्यामुळे ही मुदत वाढवून मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती.

शेती हा सर्वात अनिश्चित व्यवसाय. कधी काय घडेल आणि होत्याचं नव्हतं होईल हे सांगता येत नाही. जोपर्यंत पीक काढून घरात येत नाही आणि ते विकल्यावर त्याचे पैसे हातात मिळत नाहीत तोवर शेतीचे काहीच खरे नाही. त्यामुळे नैसर्गिक संकटांपासून बचाव करण्यासाठी जर पीकविम्याची जोड असेल तर शेतकऱ्यांना काहीसा आधार मिळू शकतो.