महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा (Coronavirus) वाढता संसर्ग लक्षात घेता मध्य रेल्वेने (Central Railway) अचानक प्लॅटफॉर्म तिकिटांच्या (Platform Ticket) किंमतीमध्ये पाच पटीने वाढ केली आहे. महामारीच्या पार्श्वभूमीवर, उन्हाळ्याच्या हंगामात रेल्वे प्लॅटफॉर्मवर जास्त गर्दी होऊ नये म्हणून मुंबई महानगर प्रदेशातील काही महत्त्वाच्या स्थानकांवर (एमएमआर) प्लॅटफॉर्म तिकिटाची किंमत वाढविण्यात आली आहे. एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. मीडिया रिपोर्टनुसार मुंबईतील काही स्थानकांवर आता प्लॅटफॉर्म तिकीट 50 रुपयांना मिळेल. मिळालेल्या माहितीनुसार प्लॅटफॉर्म तिकिटांची नवीन किंमत 15 जूनपर्यंत लागू राहील.
हे नवीन दर फक्त छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, पनवेल, दादर, ठाणे, कल्याण आणि भिवंडी रोड स्थानकांवर लागू होतील. आता या सर्व स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट 10 रुपयांच्या ऐवजी 50 रुपयांना मिळेल. मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले की हा नवा दर 24 फेब्रुवारीपासून लागू झाला असून तो यंदा 15 जूनपर्यंत लागू राहील. उन्हाळ्याच्या हंगामात बरेच लोक कुटुंबातील सदस्यांना लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये सोडण्यासाठी स्टेशनवर येतात. यामुळे स्थानकांवर खूप गर्दी होते. आता अशा गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी रेल्वेने हा उपाय योजला आहे. (हेही वाचा: Mumbai: कॉटन ग्रीन आणि शिवडी स्थानकादरम्यान एका महिलेसोबत घडला धक्कादायक प्रकार; गुन्हा दाखल)
यापूर्वीही गर्दी होऊ नये म्हणून रेल्वे प्लॅटफॉर्मची तिकिटे वाढवत आली आहे. दरम्यान, मुंबईमध्ये फेब्रुवारी महिन्यात कोरोना संसर्गामध्ये वाढ होताना दिसत आहे. शहरात आतापर्यंत कोविड-19 च्या 3.25 लाखांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे आणि संक्रमणामुळे 11,400 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. काल मुंबईमध्ये कोरोनाच्या 855 रुग्णांची नोंद झाली आहे असून, 4 लोकांचा मृत्यू झाला आहे. सध्या शहरात 9690 सक्रीय रुग्ण आहेत.