मुंबईत (Mumbai) प्लास्टिक बंदीविरोधात (Plastic Ban) बीएमसीने कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवार 21 ऑगस्टपासून ही कारवाई सुरू होणार आहे. आता फेरीवाले, दुकाने, मॉल्सवर छापे टाकताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) चे अधिकारी आणि पोलीस हवालदार बीएमसी अधिकाऱ्यांसोबत असतील.
बीएमसीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ‘गेल्या एक वर्षापासून बीएमसी एमपीसीबीला अहवाल पाठवत होती. पण यावर्षी त्यांनी आमच्याशी संपर्क साधला आणि छापेमारीत त्यांच्या अधिकार्यांचा समावेश करण्यास सांगितले. गेल्या शुक्रवारी त्यांनी त्यांच्या 24 अधिकाऱ्यांची यादी आम्हाला पाठवली आहे.’
आता प्रत्येक प्रभागात पाच सदस्यीय पथक प्लास्टिकविरोधात कारवाई करणार आहे. प्लॅस्टिकच्या वापर आणि विक्रीवर कारवाई करण्यासाठी संपूर्ण मुंबईत एकूण 120 लोक आहेत. बीएमसीने गेल्या वर्षभरात 1,586 छापे टाकून 5285 किलो प्लास्टिक जप्त केले असून, 79 लाख रुपये दंड वसूल केला आहे.
याआधी 2018 मध्ये, राज्य सरकारने एकल वापराच्या प्लास्टिकवर बंदी घातली होती आणि बीएमसीने फेरीवाले आणि दुकान मालकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली. मात्र, कोविड-19 साथीच्या आजारामध्ये हे काम थांबवल्यात आले होते. त्यानंतर नागरी संस्थेने जुलै 2022 मध्ये पुन्हा कारवाई सुरू केली. (हेही वाचा: Waghela Tea Depot Raid: महाराष्ट्रातील प्रतिष्ठित 'वाघेला चहा' डेपोवर FDA चा छापा; लाखो रुपयांची भेसळयुक्त पावडर जप्त)
दरम्यान, केंद्र सरकारने 1 जुलै 2022 पासून काही एकल वापर प्लास्टिकच्या वस्तूंवर संपूर्ण बंदी लागू करण्याचे जाहीर केले. मुंबई महापालिका प्लास्टिक बंदी 2022 नियमानुसार उत्पादक, साठेदार, पुरवठादार, विक्रेते यांनी नियमभंग केल्यास त्यांच्यावर महाराष्ट्र विघटनशील व अविघटनशील कचरा (नियंत्रण) अधिनियम 2006 च्या कलम 9 अन्वये कारवाई होते. त्यात पहिल्या गुन्ह्यासाठी 5 हजार, दुसऱ्या गुन्ह्यासाठी 10 हजार त्यानंतर तीन महिन्यांपर्यंत तुरुंगवास, 25 हजार रुपयांपर्यंत दंड वसूल करण्यात येणार आहे.