Maratha Reservation | Archived, Edited, Representative Images

गेल्या अनेक दिवसांपासून वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशप्रक्रीयेचा तिढा वाढत चालला आहे. प्रवेश प्रक्रीयेत मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. आता शुक्रवारी(17 मे) राज्यातील मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार असून या बैठकीत वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशप्रक्रीयेबाबत वटहुकूम काढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे पदव्युत्तर मेडिकल प्रवेशप्रक्रीयेचा तिढा सुटण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. (पीजी विद्यार्थ्यांसोबत सरकारची बोलणी फिस्कटली, चंद्रकात पाटील यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत तोडगा नाही)

मुंबई हायकोर्टच्या नागपूर खंडापीठाने आणि सर्वोच्च न्यायालयाने यंदा वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश प्रक्रीयेत विद्यार्थ्यांना आरक्षण लागू होणार नाही, असा निर्णय दिला होता. त्यावर वटहुकूम काढण्याच्या हालचालीही गेल्या काही दिवसांपासून सरकारने सुरू केल्या होत्या. मात्र आचारसंहितेमुळे त्यात अडचणी येत होत्या. आता मात्र वटहुकूम काढण्यास निवडणूक आयोगाने राज्य सरकारला परवानगी दिली आहे. (वैद्यकीय पदव्युत्तर विद्यार्थ्यांचा आत्महत्येचा इशारा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले 'कोणावरही अन्याय होऊ देणार नाही')

आरक्षण लागू न झाल्याने मराठा विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेत आझाद मैदानावर आंदोलनास सुरुवात केली होती. तसंच सरकारने त्वरीत वटहुकूम काढत वैद्यकीय प्रवेशाचा मार्ग मोकळा करावा नाहीत मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली होती.