Maratha Reservation Issue: पीजी विद्यार्थ्यांसोबत सरकारची बोलणी फिस्कटली, चंद्रकात पाटील यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत तोडगा नाही
Maratha Reservation Issue | (Photo credit: archived, edited, symbolic images)

Maratha Reservation Issue: राज्यातील वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेत आरक्षणाच्या मुद्यावरुन आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत सरकारची बोलणी फिस्कटली आहेत. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. बैठकीत कोणताही तोडगा निगाला नाही. त्यामुळे विद्यार्थी आंदोलनावर ठाम आहेत. विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घ्यावे यासाठी सरकारडून प्रयत्न सुरु होते. लेखी अश्वासन दिल्याशिवाय कोणत्याही चर्चेला आपण तयार नसल्याचे विद्यार्थ्यांनी या बैठकीतही सरकारला ठासून सांगितले. त्यामुळे या बैठकीतही बोलणी पुढे सरकू शकली नाहीत. आपल्या मागण्यांसाठी हे विद्यार्थी आझाद मैदान (Azad Maidan) येथे आंदोलन करत आहेत.

राज्यातील वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेत आरक्षणाच्या मुद्यावर सरकारने परिपत्रक काढून 25 मे पर्यंत मुदत वाढ देत असल्याचे म्हटले होते. सरकारने परिपत्रक काढले असले तरीही विद्यार्थी आंदोलनावर ठाम होते. सरकारने परिपत्रक काढून मुदतवाढ दिली. मात्र, या परिपत्रकातच घोळ असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला होता. हे विद्यार्थी आता मुख्यमंत्र्यांचे सरकारी निवासस्थान वर्षा बंगल्यावर आंदोलन करण्याच्या तयारीत होते. दरम्यान, सरकारच्या वतीने चंद्रकांत पाटील हे या आंदोलक विरद्यार्थ्यांसाठी चर्चा करत होते. मात्र, सरकारने लेखी अश्वासन द्यावे आणि मगच चर्चेला सुरुवात करावी अशी भूमिका विद्यार्थ्यांनी पाटील यांच्यासमोर मांडली. त्यामुळे आता या आंदोलनावर पुढे काय तोडगा निघतो याबाबत उत्सुकता आहे.

सरकारने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार, विद्यार्थ्यांच्या राज्यातील वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेला 25 मे पर्यंत मुदतवाढ दिली आहे. तर याच पत्रकात सरकारने न्यायालयाच्या निर्णयाला आधीन राहूनच आम्ही हा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. मात्र, आम्हाला मुदतवाढ हवी अशी आमची कधीच मागणी नव्हती. उलट आमचे आरक्षण कसे टिकेल आमचा मुद्दा निर्णायक पद्धतीने निकालात कसा निघेल याबाबत विचार करावा अशी आमची मागणी होती, असे आंदोलक विद्यार्थ्यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, मुंबई: आझाद मैदान येथे मेडीकलच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन कायम, सरकारी आश्वासन केवळ अद्याप तरी कागदावरच)

दरम्यान, सरकारने हे परिपत्रक काढले. मात्र, आता प्रवेश प्रक्रिया अर्ज दाखल करण्यासाठी केवळ दोनच तास बाकी आहेत. त्यामुळे हे सर्व विद्यार्थी एकाच वेळी जर अर्ज दाखल करण्यासाठी ऑनलाईन प्रक्रियेचा वापर करु लागले तर, ती साईट कसा प्रतिसाद देईल हेही पाहावे लागेल. अनेकदा अशा वेळी सर्वर डाऊन होण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे सरकारच्या मनात आमच्या विषयाबद्दल काय आहे, हेच कळायला मार्ग नाही, अशी भावना काही विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.