CM Uddhav Thackeray (Photo Credits: CMO Maharashtra)

भविष्यात साथींच्या आजारावर मात करण्यासाठी राज्यभरात समर्पित कायमस्वरूपी संसर्ग रुग्णालये उभारण्याची नितांत आवश्यकता आहे. त्यासाठी राज्यशासन प्रयत्नशील आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी सांगितले आहे. विकासात्मक कामांच्या व्यतिरिक्त आरोग्याच्या पायाभूत सुविधांना आणि सुविधांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल. कोविडशी लढताना राज्यातील पालिकांना निधी कमी पडू दिला जाणार नाही, असा विश्वासदेखील यावेळी उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, आज मुख्यमंत्र्याच्या हस्ते भाईंदर पूर्व येथे कोरोनाबाधित रुग्णांवरील उपचारासाठी उभारलेल्या दोन स्वतंत्र अद्ययावत समर्पित कोविड आरोग्य केंद्रांचे ई-लोकार्पण करण्यात आले. यावेळी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महापौर ज्योत्स्ना हसनाळे आदी नेत उपस्थित होते. (हेही वाचा - शिवसेनेला हिंदूत्व व सामाजिक बांधिलकीचा विसर! खेड तालुक्यातील शेकडो शिवसैनिकांचा भाजपात प्रवेश; प्रविण दरेकर यांची माहिती)

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी यंत्रणातील समन्वय अत्यंत महत्त्वाचा आहे. क्वारंटाईन सुविधांचे नेटके व्यवस्थापन करण्यासोबतच ट्रेसिंग ट्रॅकींग आणि टेस्टींगही मोठ्या प्रमाणात कराव्यात. सर्व यंत्रणांनी मृत्यूदर रोखण्यासाठी अधिक प्रयत्न करावेत. कोरोना रुग्णांना उपचारादरम्यान अतिशय काळजीपूर्वक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. योग्य औषधोपचाराबरोबरचं रुग्णांची योग्य काळजी आणि रुग्णसेवा अत्यंत महत्त्वाची आहे. रुग्णांकडे दुर्लक्ष होता कामा नये, असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

स्थानिक प्रशासनाने कोरोना संसर्ग रोखण्याची जबाबदारी घ्यावी, प्रभावी उपाययोजना कराव्यात यासाठी शासनाकडून आवश्यक ती मदत केली जाईल. मनपांना निधीची कमतरता पडु देणार नाही. स्थानिक यंत्रणेला औषधांचा पुरेसा साठा करुन देण्यात येईल. परंतु, औषधांचा वापर कसा होतो, याबाबत सदैव जागरुक राहुन नियमांची अत्यंत काटेकोर अंमलबजावणी करण्यावर भर द्यावा, अशा सुचनादेखील उद्धव ठाकरे यांनी केल्या आहेत.