बंगाल, तामिळनाडू, केरळ या निवडणुका असणाऱ्या राज्यातून येणाऱ्या नागरिकांवर त्वरीत निर्बंध घाला- बाळा नांदगावकर
Bala Nandgaonkar (Photo Credits: Facebook)

बंगाल, तामिळनाडू, केरळ या निवडणुका असणाऱ्या राज्यातून येणाऱ्या नागरिकांवर त्वरीत निर्बंध घाला अशी मागणी मनसे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी केली आहे. तेथील निवडणुकांदरम्यान सगळे नियम झुगारले गेल्याने हे नागरिक 'सुपर स्प्रेडर' (Super Spreader)  ठरु शकतात. त्यामुळे त्यांचे वेळीच नियोजन करणे गरजेचे आहे, असे नांदगावकर यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटले आहे. दरम्यान, राज्यातील कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर रुग्णसंख्या नियंत्रण आणण्यासाठी मनसे (MNS) कडून हा सल्ला देण्यात आला आहे.

बाळा नांदगावकर यांनी ट्विटमध्ये लिहिले, "राज्य सरकारने बंगाल, तामिळनाडू, केरळ येथून येणाऱ्या नागरिकांवर त्वरित कडक निर्बंध लावणे गरजेचे आहे. कारण तिथे निवडणुकी दरम्यान सगळे नियम झुगारल्याने येणारे नागरिक हे सुपर स्प्रेडर ठरू शकता. याबाबत वेळीच नियोजन करणे अतिशय गरजेचे आहे."

बाळा नांदगावकर ट्विट:

(हे ही वाचा: Maharashtra Lockdown: मनसेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र; राज्यातील व्यापाऱ्यांसाठी केली 'अशी' मागणी)

देशाच्या पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसाम, केरळ या राज्यात आणि पॉडेचेरी येथे निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. निवडणुकांच्या प्रचारसभांमध्ये मोठी प्रमाणात गर्दी होत असते. तेथून नागरिक महाराष्ट्रात आल्यास कोरोना संसर्गाचा धोका अधिक वाढेल. त्यामुळे त्यांच्यावर निर्बंध घातल्यास धोका टाळता येईल, अशी यामागे भूमिका आहे. दरम्यान, राज्यात परप्रांतियांच्या येण्याची संख्या अधिक असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे राज ठाकरे काही दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलले होते.