महाराष्ट्रामध्ये सत्तांतरानंतर रविवार 2 जुलैच्या दुपारी अजून एक राजकीय नाट्य रंगलं. एनसीपीमध्ये शरद पवारांना दूर सारून अखेर अजित पवारांनी शिंदे- फडणवीस सरकार मध्ये सहभाग घेतला. त्यांच्यासोबत 8 आमदारांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. पण या मध्ये नेमकी शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे किती आमदार आहेत याचं चित्र स्पष्ट होऊ शकलेलं नाही. अजित पवार यांनी अंधारात ठेवून काही आमदारांच्या सह्या घेतल्या असल्याचा, दिशाभूल केल्याचा दावा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. त्यामुळे आज (5 जुलै) कोणासोबत किती संख्याबळ याचा नेमका खुलासा होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रावादी कॉंग्रेस मध्ये अजित पवारांनी सकाळी 11 वाजता कार्यकर्त्यांची, आमदारांची बैठक बोलावली आहे. तर शरद पवार यांनी दुपारी 1 वाजता वाय बी चव्हाण सेंटर वर बैठक बोलावली आहे. दोन्ही गटाकडून आपल्यासोबत आमदार असल्याचा दावा केला जात आहे. काल रात्री ANI शी बोलताना प्रफुल्ल पटेल यांनी 40 पेक्षा अधिक आमदार अजित पवारांच्या पाठीशी असल्याचंही ते म्हणाले आहेत पण त्यांच्या दाव्यात किती सत्यता आहे याचा हळूहळू खुलासा होईल. दोन्ही गटांनी आमदारांना व्हिप देखील बजावला आहे.
दरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी पक्षांतर्गत 50 पेक्षा अधिक आमदारांना भाजपा सोबत जायचं होतं तशा हालचाली, चर्चा यापूर्वी झाल्या होत्या या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पण जयंत पाटील यांनीच असे पत्र शरद पवारांना त्रास होईल म्हणून न दिल्याचा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदेंच्या वाटेवर निघालेले अजित पवार हा सत्तेसाठी मांडलेला डाव पूर्णपणे यशस्वी करू शकणार का? याची पहिली कसोटी आज होणार आहे. नक्की वाचा: Maharashtra Political Crisis: अजित पवारांचा गट शरद पवारांंपासून दूर गेल्यावरही का वापरतोय त्यांचा फोटो? Praful Patel यांनी स्पष्ट केली त्यांची भूमिका (Watch Video) .
जितेंद्र आव्हाड ट्वीट
राजकारणातील सह्याद्रीसाठी,
यशवंतरावांच्या चेल्यासाठी,
तुमच्या आमच्या आपल्या सर्वांच्या शरद पवार यांच्यासाठी उद्या आपल्याला यायचं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाची विशेष बैठक उद्या दिनांक ५ जुलै रोजी, दुपारी १.०० वाजता…
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) July 4, 2023
रूपाली चाकणकर ट्वीट
उद्या बुधवार दि.५ जुलै २०२३ रोजी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीला आपण आवर्जून उपस्थित राहावे ही विनंती. pic.twitter.com/S3Qzruqs0L
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) July 4, 2023
एनसीपीचे 2019 च्या विधानसभा निवडणूकीत 54 आमदार निवडून आले होते. जयंत पाटील यांनी 9 मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या आमदारांविरूद्ध अपात्रतेची करवाई केली आहे. त्यामुळे या बंडामध्ये अजित पवार यशस्वी होतात की शरद पवार त्यांचा करिष्मा वापरत आमदारांना आपल्याकडे ठेवण्यात यशस्वी होतात हे पाहणं गरजेचं आहे.