Sanjay Raut | (Photo Credits: ANI)

महाराष्ट्रातील पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी (Patra Chawl Case) शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची ईडी (ED) चौकशी करत आहे. दरम्यान, रविवारी, 31 जुलै रोजी दुपारी 4 वाजता राऊत यांना ईडीने ताब्यात घेतल्याचे वृत्त आले होते. सकाळी 7 वाजता सुरु झालेल्या चौकशीच्या 9 तासांनंतर राऊत यांना ताब्यात घेतले असल्याचे माध्यमांनी वृत्त दिले होते. मात्र संजय राऊत यांना तपास यंत्रणेने ताब्यात घेतले नसल्याचा दावा त्यांचे वकील विक्रांत साबणे यांनी केला आहे. ईडीने रविवारी सकाळी संजय राऊत यांना नव्याने समन्स बजावल्याचे त्यांनी सांगितले.

साबणे म्हणाले, ‘राऊत यांनी ईडीच्या कार्यालयात जाऊन त्यांचे म्हणणे नोंदवले आहेत. त्यांना ना अटक करण्यात आली आहे ना ताब्यात घेण्यात आले आहे. ईडीने मालमत्तेची काही कागदपत्रे जप्त केली आहेत, मात्र पत्रा चाळ घोटाळ्याशी संबंधित कोणतीही कागदपत्रे त्यांना सापडली नाहीत. ईडीला जी कागदपत्रे हवी आहेत, त्याची झेरॉक्स घेतली आणि आम्हाला नव्याने समन्स देण्यात आले. त्याच आधारे संजय राऊत हे जबाब नोंदवण्यासाठी कार्य्कायात गेले होते.

अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) पथक रविवारी सकाळी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या मुंबईतील निवासस्थानी पोहोचले. पत्रा चाळशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने त्यांच्या निवासस्थानाची झडती घेतली आणि संजय राऊत यांची चौकशी केली. त्यानंतर ईडीने त्यांना त्यांच्या कार्यालयात नेले. यावेळी खासदार संजय राऊत हे त्यांच्याच गाडीतून घराबाहेर पडल्याने शिवसेना समर्थक मोठ्या संख्येने जमा झाले होते. (हेही वाचा: Sanjay Raut ED Enquiry: संजय राऊत यांच्या ईडी कारवाईवर सत्ताधाऱ्यांसह विरोधक म्हणतात..)

यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना राऊत म्हणाले, ‘लोकांवर खोटे आरोप आणि कागदपत्रे तयार केली जात आहेत. शिवसेना आणि महाराष्ट्र कमकुवत करण्यासाठी हे सर्व केले जात आहे. मी झुकणार नाही आणि पक्ष सोडणार नाही.’ त्यानंतर राऊत यांनी आक्रमक भूमिका घेत एक ट्वीट केले- ‘आपण अशा व्यक्तीला कधीही हरवू शकत नाही जो कधी हार मानत नाही. झुकणार नाही! जय महाराष्ट्र.'

दरम्यान, यापूर्वी ईडीने संजय राऊत यांना दोनदा समन्स बजावले होते. ज्यामध्ये 27 जुलैला शेवटचे समन्स पाठवण्यात आले होते. मुंबईतील पत्रा चाळच्या पुनर्विकासातील कथित अनियमिततेशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात राऊत यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले होते. शिवसेनेचे उद्धव ठाकरे कॅम्पचे खासदार संजय राऊत यांनी कोणतेही गैरकृत्य केल्याचे नाकारले असून, राजकीय सूडबुद्धीने आपल्याला लक्ष्य केले जात असल्याचा आरोप केला आहे.