Lockdown | File Image | (Photo Credits: PTI)

राज्यातील कोरोना बाधितांची संख्या पुन्हा मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहे. त्यामुळे अनेक शहरांमध्ये कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. औरंगाबाद (Aurangabad) शहरातही आजपासून अंशत: लॉकडाऊन (Lockdown) असणार आहे. तर शनिवार-रविवार पूर्ण लॉकडाऊन असणार आहे. 4 एप्रिलपर्यंत अंशत: लॉकडाऊन सुरु राहणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. लॉकडाऊन काळातील नियमांचे उल्लंघन केल्यास गुन्हा दाखल करण्यात येणार असून त्यासाठी जिल्हा प्रशासन, महापालिका आणि पोलीस यंत्रणा सज्ज आहे. दरम्यान, औरंगाबाद शहरात 11 मार्च ते 4 एप्रिल पर्यंत असलेल्या अंशत: लॉकडाऊनच्या कालावधीत नेमक्या कोणत्या सुविधा सुरु राहणार आणि कोणत्या बंद? जाणून घेऊया...

काय बंद?

# औरंगाबाद शहरात राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमास बंदी आहे. त्याचबरोबर लॉकडाऊन काळात मंगल कार्यालय, लॉनमधील लग्न सोहळ्यावर बंदी घालण्यात आली आहे.

# जाधववाडी भाजीबाजारा सह आठवडी बाजारही बंद.

# शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस, शैक्षणिक संस्था बंद.

# स्विमिंग पूल, क्रीडा स्पर्धा बंद.

# खासगी कार्यालये बंद.

# शनिवार-रविवार पूर्ण लॉकडाऊन असल्याने बाजारपेठा, मॉल, चित्रपटगृहे, हॉटेल्स बंद. केवळ होम डिलिव्हरी सुरु राहील.

काय सुरु?

# जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, किराणा दुकाने, दूध विक्री, भाजीपाला-फळे विक्री.

# चिकन, मटण, अंडी-मांस विक्रीची दुकाने.

# हॉटेल, बार, रेस्टॉरंट, परमिट रूम, खाद्यपदार्थांची दुकाने 50 टक्के क्षमतेवर रात्री नऊपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी. पार्सल सुविधा रात्री 11 पर्यंत सुरु राहणार.

# वृत्तपत्र वितरण

# वैद्यकीय सेवा

# बँक सेवा

# पेट्रॉल पंप

# बांधकामे, उद्योग कारखाने

# वाहन दुरुस्ती

#पशुखाद्य सेवा

(हे ही वाचा: जळगाव मध्ये 11 ते 15 मार्च पर्यंत जनता कर्फ्यू; काय राहणार सुरु काय बंद? जाणून घ्या)

औरंगाबाद शहरातील दिवसाला 550 पर्यंत कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. त्याचबरोबर मृत्यूदरही वाढला आहे. त्यामुळे अंशत: लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला असून त्याकाळात नागरिकांनी नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे.