औरंगाबाद मध्ये 11 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत अंशत: लॉकडाऊन, दर शनिवार-रविवार कडकडीत बंद
Lockdown (Photo Credits: PTI)

Lockdown in Aurangabad: महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी राज्यात कोरोनाचे नियम आणखी कडक करण्यात आले आहे. दरम्यान औरंगाबाद (Aurangabad) वाढती कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता शहरात अंशत: लॉकडाऊन (Partial Lockdown) ठेवणार असल्याची घोषणा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण (Sunil Chavan) यांनी केली आहे. यात 11 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत औरंगाबाद मध्ये दर शनिवार आणि रविवार कडक लॉकडाऊन पाळण्यात येणार आहे. या गोष्टीची दखल घेत नागरिकांनी या मोहिमेत प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी यावेळी हा देखील इशारा दिला की, अंशत: लॉकडाउनच्या काळात जर रुग्णसंख्या अधिक वाढली तर संपूर्ण लॉकडाउन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. याशिवाय खासगी व कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांना प्रत्येक 15 दिवसांनी करोना चाचणी करणे बंधनकारक असणार आहे. त्या संबंधीचे प्रमाणपत्र देखील सर्वांनी सोबत बाळगणे आवश्यक राहणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.हेदेखील वाचा- Coronavirus: महाराष्ट्रामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग वाढला; आज राज्यात 11,141 तर मुंबईमध्ये 1,360 Covid-19 रुग्णांची नोंद

या अंशत: लॉकडाउनच्या कालावधीत धार्मिक कार्यक्रम, राजकीय सभा, आंदोलन, सामाजिक कार्यक्रम, आठवडी बाजार, जलंतरण तलाव, शाळा-महाविद्यालयं संपूर्ण बंद असतील. विशेषकरून मंगलाकार्यालयं, सभागृह यामध्ये होणाऱ्या विवाह समारंभांना परवानगी नाकारण्यात आलेली आहे. तर, शनिवारी व रविवारी केवळ वैद्यकीय सेवा, माध्यम कार्यालय, दूध विक्री, भाजीपाला,फळविक्री सुरू असणार आहे.

औरंगाबाद मध्ये सद्य घडीला 4264 कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर कोरोना बाधितांची एकूण संख्या 55,101 वर पोहोचली आहे. तर एकूण 1278 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान आज महाराष्ट्रामध्ये 11,141 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, 6,013  रुग्ण बरे झाले आहेत. आज राज्यात 38 मृत्यूंची नोंद झाली आहे. अशाप्रकारे एकूण प्रकरणांची संख्या 22,19,727 झाली आहे.