Parliament building (Photo Credits: Twitter)

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाने राज्यसभेत स्थगन प्रस्ताव देण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार वंदना चव्हाण (Vandana Chavan) यांनी हा प्रस्ताव दाखल केला आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अनुद्गार काढल्याच्या मुद्द्यावरुन हा प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. संसदेचे विद्यमान कामकाज बाजूला ठेऊन या महत्त्वपूर्ण विषयावर सभागृहात चर्चा व्हावी, अशी मागणी या प्रस्तावाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कासदार वंदना चव्हाण यांनी नियम 267 अन्वये हा प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावांतर्गत मागणी करण्यात आली आहे की, केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशातीलही महापुरुष आणि प्रतिष्ठीत व्यक्तिमत्वांबद्दल अवमानकारक टिप्पणी केली जात आहे. ज्यामुळे राज्यातील जनतेला अपमानीत व्हावे लागत आहे. धक्कादायक म्हणजे राज्यपालांकडून अशा प्रकारचा अपमान केला जात आहे हे अतिशय निंदनीय आहे. (हेही वाचा, Winter Session 2022 Of Parliament: हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संसदेत महाराष्ट्र-कर्नाटक वादावरून वातावरण तापलं; सुप्रिया सुळेंनी भाजपाला सुनावलं)

ट्विट

दरम्यान, काँग्रेस खासदार रजनी पाटील यांनीही राज्यसभेत नियम 267 अन्वये नोटीस दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, राज्यपाल बगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन सभागृहात चर्चा व्हावी.

काय आहे प्रकरण?

औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात 19 नोव्हेंबर रोजी आयोजित एका कार्यक्रमात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल काढलेल्या उद्गारावरुन वाद निर्माण झाला आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी म्हटले होते की, 'तुम्हाला जर कोणी विचारले तुमचे आदर्श कोण आहेत. तर तुम्हाला ते शोधण्यासाठी महाराष्ट्रबाहेर जाण्याची गरज नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श झाले. नितीन गडकरी हे आज नव्या काळातील आदर्श आहेत.'