कोविड-19 लॉकडाऊन (Covid-19 Lockdown) काळात बिकट झालेल्या आर्थिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शाळेच्या फी मधून पालकांना सवलत मिळावी अशी मागणी जोर धरत होती. या संदर्भात अनेक पालक संघटनांनी शिक्षण विभागाकडे दाद मागितली होती. परंतु, शालेय फी मधून अद्याप पालकांना सवलत मिळणार नसल्याचे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, कोरोना लॉकडाऊन काळात सर्व शाळांनी पालकांकडून शुल्क जमा करुन नये. लॉकडाऊन नंतर फी आकारणी करावी अशा सूचना शालेय शिक्षण विभागाने दिल्या होत्या. (खासगी शाळांमधील फी वाढीचा वाद आता समितीकडून सोडवला जाणार- शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड)
पालकांच्या सोयीच्या दृष्टीने मासिक, त्रैमासिक शुल्क भरण्याचा पर्याय शाळांनी द्यावा, फी वाढ करु नये. तसंच ऑनलाईन शिक्षणामुळे ज्या सुविधा वापरत नाहीत त्यांचा खर्च कमी करावा असा निर्णय शासनाने दिला होता. मात्र या विरोधात शिक्षण संस्थांनी न्यायालयाचे दार ठोठावले. यावर न्यायालयाने स्थगिती दिली असून ती उठवण्याचे काम सरकार करत आहे. दरम्यान, हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने फी कमी करण्याच्या सूचना शाळांना देता येणार नाहीत, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. (Coronavirus Lockdown: राज्यातील सर्व शाळांतील वर्ग सुरू होईपर्यंत पालकांना फी भरण्यास भाग पाडू नये - वर्षा गायकवाड)
या प्रकरणी पालक संघटनांनी आक्रमक भूमिका घेत शालेय ऑडिट करण्याची मागणी केली आहे. ती मागणी पूर्ण केल्यास शाळेला किती आणि कशी शुल्काची आवश्यकता आहे हे स्पष्ट होईल, असे मत पालक असोसिएशनच्या अध्यक्षा अनुभा सहाय यांनी केली आहे. त्यामुळे फी दरवाढ, वसुलीच्या प्रश्नावर तोडगा निघेल, असेही त्या म्हणाल्या.