Sharad Pawar and Anil Deshmukh | Photo Credits: Twitter/ ANI

महाराष्ट्रामध्ये गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या खंडणीचे आरोप माजी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी केल्याने खळबळ माजली आहे. पोलिस खात्यापासून राजकीय वर्तुळामध्ये त्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान याच प्रकरणावरून परमबीर सिंग यांची उचलबांगडी झाल्यानंतर अनिल देशमुख राजीनामा देणार का? असा सवाल विचारला जात होता. मात्र आज शरद पवार यांनी दिल्ली मध्ये पत्रकार परिषद घेत फेब्रुवारी महिन्याच्या मध्यात अनिल देशमुख हे कोरोनाबाधित होते त्यामुळे त्यांची सचिन वाझे यांच्याशी भेट घेण्याचा प्रश्न नाही असं म्हटलं आहे. आज शरद पवार यांनी हॉस्पिटलची कागदपत्र सादर करत 6-15 फेब्रुवारी 2021 काळात अनिल देशमुख कोरोनाबाधित असल्याने नागपूरच्या हॉस्पिटल मध्ये होते तर 15-27 फेब्रुवारी होम क्वारंटीन असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे अनिल देशमुखांवरील आरोपांत तथ्य नाही. तसेच त्यांच्या चौकशीचादेखील प्रश्न येत नसल्याचं सांगत अनिल देशमुख यांची पाठराखण केली आहे. Param Bir Singh’s letter: 'महाविकास आघाडी सरकार'च्या केसालाही धक्का नाही; परमबीर सिंहांच्या पत्राची चौकशी होईल: संजय राऊत.

आज दिल्लीमध्ये पत्रकार परिषद सुरू असतानाच शरद पवारांचा दावा खोडण्यासाठी काही पत्रकार आणि भाजपा नेत्यांनी ते कोरोनाबाधित असताना 15 फेब्रुवारी 2021 ला पत्रकार परिषद कशी घेतली? असा प्रश्न उपस्थित करताना दिसले. त्यावेळेस काहींनी ही ऑनलाईन पत्रकार परिषद असल्याचं म्हटलं. तर शरद पवार देखील अचानक झालेल्या या गोंधळामुळे वैतागलेले दिसले.

देवेंद्र फडणवीस ट्वीट्स

देवेंद्र फडणवीसांनी ट्वीट करत शरद पवारांना अपुरी माहिती पुरवली जात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

आज शरद पवार यांनी बोलताना परमबीर सिंह यांचं पत्र हा मुख्य मुद्दा नसून मुकेश अंबानी यांच्या घराखाली सापडलेली स्फोटकांची गाडी कोणी ठेवली हा मूळ मुद्दा असून त्याचा शोध घ्यावा असं म्हटलं आहे.

दरम्यान थोड्याच वेळात अनिल देशमुख यांनी या वादावरही स्पष्टीकरण दिले आहे. अनिल देशमुखांच्या मते 15 फेब्रुवारीला जेव्हा त्यांना नागपूरच्या हॉस्पिटल मधून सुट्टी मिळाली तेव्हा काही पत्रकार हॉस्पिटलच्या आवारात होते. कोविड 19 मुळे अशक्तपणा आल्याने तेथेच बसून पत्रकारांना काही माहिती दिली. मात्र सार्वजनिक कार्यक्रमांना जाण्याला सुरूवात 28 फेब्रुवारी पासून केल्याचं अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.