Gopinath Gad Dasara Melava 2020: माझा अभिमन्यू करण्याचा प्रयत्न केला गेला, पण मला चक्रव्यूहत जायचे आणि बाहेर यायचेही माहित आहे; पंकजा मुंडे
Pankaja Munde | (Photo Credit: Twitter)

माझा अभिमन्यू करण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतू, मला चक्रव्युहात जायचे माहिती आहे तसेच बाहेरही यायचे माहिती आहे. माझ्या विरोधात कटकारस्थान आणि राजकारण सुरु आहे. परंतू, काही झाले तरी मी खंबीर आहे. जोपर्यंत माझ्याकडे जनसंपत्ती आहे. लोकांचा पाठिंबा आहे तोपर्यंत आपण खंबीर आहोत, असा इशारा पंकजा मुंडे (Pankaja Munde ) यांनी आपल्या विरोधकांना दिला आहे. त्या गोपीनाथगड (Gopinath Gad) येथून बोलत होत्या. पकंजा मुंडे या गोपीनाथ गड यथे दसरा मेळावा (Gopinath Gad Dasara Melava 2020) घेतात. यंदाही त्यांनी तो घेतला. परंतू कोरोना व्हायरस संकटामुळे अत्यंत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत त्यांनी हा मेळावा (Dasara Melava 2020) पार पडला. या मेळाव्याचे सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांतून लाईव्ह प्रसारण झाले.

आपले राजकारण संपले नाही

या वेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी सांगितले की, माझ्यावर अनेक आरोप झाले. अपप्रचार करण्यात आला. पंकजा मुंडे या राजकारण करत नाहीत. त्या घरातूनही बाहेर पडत नाहीत असा अपप्रचारकरण्यात आला. परंतू, कोरोना व्हायरस ही महामारी जगभर आहे. राज्य आणि देशातही आहे. अशा वेळी सभा घेऊन गर्दी करु नका अशी विनंती अधिकाऱ्यांकडून मला करण्यात आली होती. त्यामुळे मोठ्या सभा घेणे घराबाहेर पडणे मी टाळत होते, असे मुंडे म्हणाल्या. दरम्यान, या पुढे आपण जनसेवेसाठी घराबाहेर पडणार आहोत. आपले राजकारण संपलं नाही. कोरोना काळ असला तरी सर्व नियमांचे पालन करुन आपण घराबाहेर पडणार, असेही पंकजा मुंडे या वेळी म्हणाल्या.

एकदा शिवाजी पार्क भरवायचं आहे

कोरोना व्हायरस संकटामुळे या वेळी दरवर्षीप्रमाणे मेळावा घेता आला नाही. तरीही तुम्ही गर्दी केली. पण ठिक आहे. पुढच्या वर्षी याही पेक्षा अधिक गर्दी करु. इतकेच नव्हे तर एकदा आपल्याला शिवाजी पार्क भरवायचं आहे. त्या दृष्टीने आपण राज्यभर फिरणार आहोत, असेही पंकजा मुंडे यांनी या वेळी सांगितले. (हेही वाचा, Pankaja Munde vs Suresh Dhas: भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; पंकजा मुंडे विरुद्ध सुरेश धस आमने-सामने, ऊसतोड मजुरांच्या मुद्द्यावरुन संघर्ष)

शेतकऱ्यांसाठी अधिक मदतीची आपेक्षा

दरम्यान, राज्य सरकारने पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून शेतकऱ्यांना 10 हजार कोटी रुपयांचे पॅकेज दिले आहे. या पॅकेजचे स्वागत आहे. परंतू, हे पॅकेज पुरेसे नाही. दहा हजार कोटी रुपयांच्या पॅकेजमध्ये साधा रुमालही येणार नाही, असे मुंडे म्हणाल्या.

दरम्यान, ऊसतोड कामगारांचे प्रश्न जाणून घेऊन त्यांची सोडवणूक फडात बसूनच करण्यात आली पाहिजेत असे कुणी सांगिलंय? जर तुमच्यात इच्छाशक्ती असेल तर मुंबईच काय दिल्लीत जरी तुम्ही असाल तरीही प्रश्न सोडवता येऊ शकतात, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. दरम्यान, उसतोड कामगारांच्या प्रश्नासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण अधिक सक्षमपणे प्रयत्न करु असेही त्या म्हणाल्या.