Pankaja Munde Dussehra Rally: पदाची अपेक्षा नाही, परळी विधानसभा निवडणूक लढवणार- पंकजा मुंडे
Pankaja Munde | (Photo Credit - Twitter)

Pankaja Munde Speech: पक्षामध्ये मी नाराज नाही. माझी कोणावरही नाराजी नाही. कार्यकर्त्यांनीही पंकजा मुंडे यांना आमदारकी द्यावी अशी मागणी करणे बंद करा. पक्षाचा एक नियम आहे. पक्षाची शिस्त आहे. राजा असो की रंक. भाजपमध्ये जे जे असतात त्यांना पक्षाची शिस्त लागू होते. त्यामुळे उगाचच आग्रह करु नका. मी आता थेट 2024 च्या तयारीला लागली आहे. त्यामुळे तुम्हीही 2024 च्या तयारीला लागा, असे म्हणत पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी विधानसभा निवडणूक 2024 (Assembly Election 2024) चे रणशिंग फुंकले आणि विधानसभा उमेदवारीसाठी दावेदारीही केली. पक्षाने तिकीट दिले तर परळी विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवणार असेही पंकजा मुंडे म्हणाल्या. त्या बीड येथील भगवान भक्ती गडावर दसरा (Pankaja Munde Dussehra Rally) मेळाव्यात बोलत होत्या.

पंकजा मुंडे म्हणाल्या की,  हा मेळावा चिखलफेक करणाऱ्यांचा नाही. हा मेळावा चिखल तुडवणाऱ्यांचा आहे. आमच्यावर अनेकांनी आरोप केले, टीका केली, चिखलफेक केली. पण आम्ही कोणावरी अशा प्रकारची चिखलफेक केली नाही. आरोप, टीका केली नाही. ते आमच्या रक्तात नाही. प्रीतम मुंडे यांनी इथे सांगितले 'संघर्ष करो' या घोषणा बंद करा. होय, त्यांचे खरे आहे. संघर्ष कोणाला चुकला आहे? संघर्ष करणाऱ्यांचेच नाव होते. जोडे उचलणाऱ्यांचे नाव होत नाही, असे म्हणत पंकजा मुंडे यांनी विरोधकांना अप्रत्यक्षरित्या टोला लगावला. (हेही वाचा, Pankaja Munde on Racism: 'मोदीजीही मला संपवू शकत नाहीत', पंकजा मुंडे यांचे वंशवादावर वक्तव्य)

गोपीनाथ मुंडे यांचा उल्लेख करत पंकजा म्हणाल्या,  संघर्ष माझ्या रक्तात आहे. करोणत्याही आगीतून नारळ काढायला मी घाबरत नाही. मी केवळ गोपीनाथ मुंडे यांचा विचार, वारसा चालवत नाही. तर, गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांनी ज्या दिनदयाळ उपाध्याय, अटलबीहारी वाजपेयी यांचा विचार घेतला. तोच विचार आणि वारसा मी पुढे घेऊन निघाले आहे. नरेंद्र मोदी यांचा वारसा पुढे घेऊन जाते आहे. म्हणूनच ही गर्दी जमते आहे. हा मेळावा सर्वसामान्य, गोरगरीब जनतेचा आहे. मला माझ्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी सांगितले आहे, 'गर्दी हीच तुमची ताकद आहे'. त्यामुळे घाबरत नाही. अनेकांना वाटतं पंकजा मुंडे यांना डावलले जाते. त्यांना आता पेटीत बंद करुन ठेवतायत की काय. पण ही जनता हिच माझी ताकद आहे. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही.

Pankaja Munde | (Photo Credit - Twitter)

कार्यकर्त्यांना उद्देशून बोलताना पंकजा मुंडे यांनी म्हटले की,  अनेक लोक म्हणतात पंकजा ताई तुम्ही बोला. टीका करा. पण अरे मी जर माझ्या विरोधक आणि शत्रुंबद्दलही वाईट बोलत नाही. तर, माझ्याच लोकांवर टीका कशी करेन. मी शत्रुलाही वाईट बोलतनाही तर विचारांचा वारसा चालवणाऱ्यांवर टीका कशी करणार? असा सवाल उपस्थित करत पंकजा मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी व्यक्त केलेल्या भावनांना मागे एका भाषणात पंतप्रधान मोदींचे नाव घेऊन व्यक्त केलेल्या विधानाची पार्श्वभूमी होती.

पंकजा मुंडे भाषण (व्हिडिओ)

मी खुर्चीसाठी राजकारणात आले नाही. खुर्चीसाठी राजकारणात आले असते तर इथे अशी गर्दी जमली नसती. दोन लोकही आले नसते. पण कार्यकर्त्यांना आपल्या नेत्याला पद मिळावे, यासाठी चूक काय. त्यांना सहाजिक तसे वाटणार. पण भाजपचा एक नियम आहे. ज्यांनी निवडणूक लढली आहे. त्यांना पुन्हा तिकीट दिले जात नाही. पक्षाचा नियम आहे. तो मला मान्य आहे. त्यामुळे मला त्यावरुन विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना उत्तरेच द्यायची नाहीत, असेही पंकजा मुंडे यांनी या वेळी सांगितले.