पंकजा मुंडे (Photo Credits: Facebook)

मराठवाड्याच्या (Marathwada) पाणी प्रश्नासाठी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी आज सोमवारी, 27 जानेवारी रोजी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले होते यावेळी त्यांनी आपण या पुढे गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजकार्य करणार असल्याचं स्पष्ट केलं, मात्र असं असलं तरीही मी भाजप (BJP)  कधीच सोडणार नाही त्यामुळे अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असेही त्यांनी आपल्या समर्थकांना सांगितले. तसेच, पंकजा यांनी त्यांच्या लाक्षणिक उपोषणाला सुरुवात करताना जनतेशी संवाद साधला व त्यांचे उपोषण हे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)  यांच्या सरकारवर निशाणा साधण्यासाठी व टीका करण्यासाठी नाही असे स्पष्ट केले. हे उपोषण फक्त मराठवाड्यातील पाणीप्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी आहे असंही त्या म्हणाल्या. नव्या सरकारकडून चांगल्या अपेक्षा आहेत. मी 100 दिवसात काही त्यांच्यावर टीका करणार नाही असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.आजच्या दिवसाचे अपडेट्स जाणुन घ्या एका क्लिक वर

मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचे आणि तरुणांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत. ठाकरे सरकारने इथला प्राणी प्रश्न सोडवला पाहिजे. तसंच आमच्यापेक्षा चांगलं काम करुन दाखवा असंही आवाहन पंकजा मुंडे यांनी केलं आहे. मराठवाड्यातले शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी उद्धव ठाकरे चांगलं काम करतील असाही विश्वास पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला.

पंकजा यांनी ठाकरे सरकारवर टिका करणार नाही असे म्हणताना महाराष्ट्रात विरोधी पक्षात बसलेल्या भाजपला मात्र अलगद चिमटा काढला आहे. आता कार्यकर्ते चांगलं वागत आहेत, विरोधात असताना तुम्ही चांगलं वागता का? त्यामुळे विरोधातच बसावं का? असा मिश्किल प्रश्न पंकजा यांनी विचारत आपल्याच पक्षाला निशाणा केले होते.

दरम्यान, पंकजा यांच्या उपोषणाला आज माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा अनेक भाजप नेत्यांसोबत हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी आघाडी सरकारवर हल्लाबोल करताना "मराठवाड्याच्या हिश्श्याचे पाणी आमच्या सरकारने द्यायचा प्रयत्न केला होता. परंतु, आताच्या सरकारने त्या योजना रद्द केल्या तर आम्ही मोठी लढाई लढू." तसेच आघाडीच्या काळात मराठवाड्यावर अन्याय होत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.