Pandharpur Vitthal Rukmini Mahapuja 2020: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आषाढी एकादशीला उद्या पहाटे होणार विठ्ठल रूक्मिणीची शासकीय महापुजा
Vitthal-Rukmini | Photo Credits: Facebook

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या आषाढी यात्रेवर अनेक निर्बंध आहेत. सरकारने मानाच्या 9 पालख्यांना पंढरीला जाण्यासाठी परवानगी दिली आहे. यावर्षी विठ्ठल आणि रुक्मिनीमातेची शासकीय महापूजा (Vitthal Rukmini Mahapuja) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि त्यांची पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांच्या हस्ते होणार आहे. उद्या बुधवार 1 जुलै 2020 रोजी पहाटे 2.20 ते 3.30 या कालावधीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्निक श्री विठ्ठल आणि रुक्मिणी यांची शासकीय महापूजा करण्यात येणार आहे. आषाढी एकादशीला यावर्षी पंढरपुरात होणाऱ्या शासकीय महापुजेसाठी मुख्यमंत्र्यांसोबत पुजेचा मान असणाऱ्या मानाचे वारकरी म्हणून विणेकरी विठ्ठल ज्ञानदेव बडे यांची यासाठी निवड करण्यात आली आहे. ते गेल्या सहा वर्षांपासून विठ्ठल मंदिरात सेवा करत आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, तसेच विठ्ठल भक्तांना कोरोनाची लागण होऊ नये, यासाठी आषाढी यात्रेनिमित्त भाविकांना पंढरपुरात येण्यास बंदी केली आहे. आषाढी यात्रा कालावधी 22 जून 5 जुलै 2020 असा राहणार आहे. आषाढी यात्रा एकादशीनिमित्त असणारी विठ्ठलाची शासकीय महापूजा मुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्या पहाटे करण्यात आले आहे. पुणे विभागीय माहिती कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालय, सोलापूर यांच्यामार्फत व्हिडीओ, छायाचित्रे, बातमी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या सोहळ्याचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यासाठी दुरदर्शनची सहाजणांची टीम सोमवारी पंढरपुरात दाखल झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून या सर्वांची स्वॅब टेस्ट घेतली गेली आहे. हे देखील वाचा- Pandharpur Wari 2020: आज संत तुकोबा, ज्ञानोबा महाराजांच्या पालख्या ST बसने पंढरीकडे प्रस्थान ठेवणार

यावर्षी आषाढी वारीला भाविक नाहीत. त्यामुळे दर्शन रांग नाही. त्यामुळे यंदा मानाचा वारकरी कोण? असा प्रश्न उभा राहिला होता. त्यामुळे चिठ्ठी टाकून याची निवड करण्यात यावी, असे ठरले आहे. त्यानुसार, मंदिर समितीचे सहअध्यक्ष हभप गहिनीनाथ औसेकर, सदस्य संभाजी शिंदे, हभप ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या उपस्थितीत मंदिरातील सहा विणेकऱ्यांची नावे चिठ्ठीत लिहिली गेली. यातील एका चिठ्ठीतील विणेकरी यांना महापूजेचा मान मिळणार होता. त्याप्रमाणे विठ्ठल ज्ञानदेव बडे (सध्या रा. पंढरपूर, मूळगाव- चिंचपूर, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) यांना महापुजेचा मान मिळाला आहे.

कोरोना विषाणूने संपूर्ण महाराष्ट्राला हादरून सोडले आहे. या संकटापासून महाराष्ट्राला मुक्त कर म्हणून विठुरायाला साकडे घालणार आहे, असे उद्धव ठाकरे रविवारी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून बोलत होते.