Shri Vitthal Rukmini Temple (Photo Credit: Twitter)

कोरोनाच्या (Coronavirus) वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात (Maharashtra) कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. दरम्यान, महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या नव्या नियमावलीनुसार राज्यातील मंदिरे देखील पुन्हा एकदा बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याचपार्श्वभूमीवर पंढरपूर येथील विठुरायाचे मंदीर (Shri Vitthal Rukmini Temple) आज सायंकाळी 7 वाजता कुलूपबंद होणार आहे. यामुळे येत्या 30 एप्रिल पर्यंत भाविकांसाठी विठुरायाचे दर्शन घेता येणार नाही. येत्या 13 एप्रिल रोजी गुढीपाडवादेखील देवाला भाविकांविना साजरा करावा लागणार आहे. तसेच यावर्षीही नवीन मराठी वर्षाचा आरंभ भाविकांना विठुरायाच्या दर्शनाविनाच करावा लागणार आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाहीर केलेल्या निर्बंधानंतर मंदिर समितीचे सहाध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी इतर सदस्यांशी चर्चा करून आज सायंकाळपासून मंदिर भाविकांना बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. कोरोनाचे संकटाचा संसर्ग कमी न झाल्यास गेल्यावर्षीप्रमाणे हे निर्बंध अजून किती दिवस वाढणार? याची चिंता भाविकांना लागली आहे. हे देखील वाचा- महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आली असून रुग्णांच्या संख्येत तुफान वाढ, नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे शरद पवार यांचे आवाहन

नागरिकांना आत्मिक शांती, प्रेरणा व श्रद्धा मिळण्याचे मंदिरे व धार्मिक स्थळे हे एकमेव स्थान आहे. राज्यातील सर्व छोट्या-मोठ्या मंदिरांवर उदरनिर्वाह असणारे हजारो नागरिक मंदिरे बंद होणार असल्याने मोठ्या संकटात सापडली आहेत. कोरोना संकटामुळे गेले अनेक महिने राज्यातील मंदिरे बंद होती. दरम्यान, कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात अटोक्यात आल्यानंतर मंदिरे उघडण्यात आली होती. मात्र, राज्यात पुन्हा एकदा कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे राज्य सरकार आणि प्रशासनाकडून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे.