प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

पाऊस सुरू झाला की वारकर्‍यांना जून महिन्यांत वारीचे वेध लागतात. पण भारतामध्ये अद्यापही कोरोनाचं संकट पूर्णपणे शमलेले नसल्याने पंढरपूरची आषाढी वारी या वर्षी सलग दुसर्‍यांदा पायी न करण्याचा निर्णय झाला आहे. पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आषाढी वारी (Ashadhi Ekadashi Wari) यंदा पायी न जाता बस ने जाणार असल्याची घोषणा केली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंडा अधिक लोकांना या वारीमध्ये समावेश करता येईल पण सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळून आणि पूर्ण खबरदारी घेऊनच वारी सोहळा होणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे.

मीडीया रिपोर्ट्सनुसार, आषाढी वारी 2021 मध्ये यंदा 10 महत्त्वाच्या पालख्यांना परवानगी देण्यात येणार आहे. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात प्रस्थानाला 100 जण तर इतर पालख्यांमध्ये 50 जण सहभागी होऊ शकतात. तर दोन्ही सोहळ्याच्या एकूण 60 जणांना बसने जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान पालखी सोहळ्यात 100 जण जात असले तरीही पूजेला केवळ 5 जण उपस्थित राहू शकणार आहेत.

आषाढी सोहळ्यात यंदा महाद्वार काल्याला परवनगी देण्यात आली आहे. तर रथोत्सव देखील साधेपणाने साजरा होईल अशी माहिती देण्यात आली आहे. वाखरी पर्यंत यंडा पालखी बसने जाणार आहे तर त्यानंतर पूजा होईल.

यंदा आषाढी एकादशी 20 जुलै दिवशी आहे. या आषाढीला भाविकांसाठी विठ्ठल रूक्मिणीचं दार भाविकांसाठी बंद राहणार आहे पण 12 जुलै पासून 24 तास हे मंदिर ऑनलाईन दर्शनासाठी खुलं ठेवण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वीच जाहीर करण्यात आला आहे.