कोरोना संकटाचं सावट यंदा देखील आषाढी वारी ( Ashadhi Ekadashi Wari) वर आहे. महाराष्ट्रासह देशामध्ये कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी सरकार आणि प्रशासन सावध पावलं उचलत आहे. त्यामुळेच यंदा आषाढी वारी 2021 पायी रद्द करत बसच्या माध्यमातून विठूमाऊलीच्या दर्शनासाठी रवाना केली जाणार आहे. उद्या म्हणजेच 20 जुलै दिवशी आषाढी एकादशी असल्याने आज (19 जुलै) पासूनच हरिनामाचा जप करत मानाच्या पालख्या पंढरपुराकडे रवाना होण्यास सुरूवात झाली आहे. या पालखी सोहळ्यतील पहिली मानाची संत मुक्ताई संस्थानच्या संत मुक्ताई पालखी जळगाव मधून रवाना झाली आहे. खास सजवलेल्या बसमधून ती पंढरकडे निघाली आहे. नाशिक मधून निवृत्ती महाराजांची पालखी देखील रवाना झाली आहे. Curfew In Pandharpur: आषाढी वारी दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर मध्ये 17-25 जुलै दरम्यान संचारबंदी; सोलापूर जिल्ह्यात त्रिस्तरीय नाकाबंदी.
दरम्यान आज दुपारी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली आणि संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या बसमधून पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहे. यंदा राज्य सरकार कडून मानाच्या 10 पालख्यांना आणि त्यासोबत 400 वारकर्यांना पंढर पूर मध्ये प्रवेश असणार आहे.
संत मुक्ताई पालखी
निवृत्ती महाराजांची पालखी
पंढरपूरात कसा यंदाचा आषाढी वारीचा सोहळा?
राज्य परिवहन मंडळाच्या बस द्वारा येणार्या पालख्या आज 'वाखरी' येथे दाखल होणार आहेत. संताच्या भेटी घेऊन त्या पुढे पंढरपूर कडे रवाना होतील. वाखरी ते इसबावी मधील विसावा मंदिर या 3 किमीच्या परिसरात 40 वारकरी पायी वारी करतील. तर इसबावी ते पंढरपूर पायी वारी साठी केवळ 20 वारकर्यांना परवानगी असेल. अन्य 380 वारकरी मठाकडे परतणार आहेत.
परंपरेनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सपत्निक विठुरायाची पूजा करणार आहेत. त्यांच्यासोबत मंदिरात वीणा वादन करणार्या कोलते जोडप्यांना मुख्यमंत्र्यांसोबत पूजा करण्याचा मान मिळणार आहे.