पालघर पोलिसांनी (Palghar Police) सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करत एका दलालाही ताब्यात घेतले आहे. राजेश प्रभाकर मेहेर (वय 38) नावाचा हा दलाल सातपाटी ब्राह्मणी पाडा इथला रहिवासी आहे. पालघरमधील सातपाटी पोलीस ठाणे हद्दीत सेक्स रॅकेट (Sex Racket) चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई केली असता त्यात सत्यता आढळली. सातपाटी पोलीस ठाण्यात दलालाविरोधात अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमाअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयात आरोपीला हजर केले असता त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
सातपाटी पोलीस ठाण्यात अशा प्रकारे नोंद झालेला हा पहिलाच गुन्हा असल्याचे समजते. हे सेक्स रॅकेट उघडकीस आणण्यात उपविभागीय अधिकारी विकास नाईक, सातपाटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर तसेच पोलीस उपनिरीक्षक सनिल पाटील व कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. या गुन्ह्यासंदर्भात पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आरोपी हा सातपाटी पोलीस ठाणे हद्दीतील सुनाभट्टी शिरगाव येथे एक सदनिका भाड्याने घेऊन निवासास होता. या ठिकाणी तो केवळ नावालाच निवासाला होता. निवासाच्या आडून तो येथे सेक्स रॅकेट चालवत असे. गेली चार ते पाच महिने आरोपी येथे सेक्स रॅकेट चालवत असल्याचा अंदाज आहे. (हेही वाचा,धक्कादायक! शिक्षिकेला अद्दल घडविण्यासाठी विद्यार्थ्याने मोबाईल नंबर टाकला डेटिंग आणि पॉर्न साईटवर )
अधिक माहिती देताना उपविभागीय पोलिस अधिकारी विकास नाईक यांनी सांगितले, पोलिसांनी सपला लाऊन एक बनावट ग्राहक येथे पाठवला. खात्री पटताच दलालाला आम्ही रंगेहात पकडला. आरोपीने दिवा येथून एका महिलेला देहविक्रीचा व्यापार करण्यासाठी प्रवृत्त करुन आणले होते असाही आरोप आहे. आम्ही त्याचा तपास करतो आहोत. परिसरात सेक्स रॅकेटचं जाळं अजून पसरलं असल्याची शक्यता आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे, असेही नाईक म्हणाले.