Navy Sailor सूरज दुबे हत्येचा तपास करण्यासाठी पालघर पोलिसांनी बनवली 10 जणांची टीम
Navy Sailor Suraj Dubey (Photo Credits: Facebook)

भारतीय नौसेना जवान (Navy Sailor) सूरज कुमार दुबे (Suraj Dubey) याच्या हत्येचे गूढ अधिकाधिक वाढत चाललं आहे. झारखंड (Jharkhand) मध्ये राहणा-या सूरजचे चेन्नईमध्ये अपहरण होणे आणि मुंबईजवळच्या पालघर मधील जंगलात त्याला जाळून मारून टाकल्याची धक्कादायक घटना समोर येणे हे एकूणच खूप गुंतागुंतीचे आहे. त्यामुळे पालघर पोलिसांना (Palghar Police) देखील यामागचा शोध घेणे हे एक मोठं आव्हान आहे. त्यामुळे या प्रकरणाचा लवकरात लवकर छडा लावण्यासाठी पालघर पोलिसांनी 10 जणांची टीम नेमली आहे. ही पोलिसांची टीम आता या घटनेचा तपास करणार आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूरजने 8 लाखांचे पर्सनल लोन घेतले होते. त्याशिवाय आणखी काही पैसे त्याने आपल्या नातेवाईकांकडून घेतले होते. असे त्याने एकूण शेअर मार्केटमध्ये 19 ते 28 लाख गुंतवले होते. मात्र सध्या त्याच्या दोन बँकेमध्ये केवळ 392 रुपयेच असल्याचे पोलिसांना कळाले. त्यामुळे पैशांची संबंधित देखील अधिक गुंतागुंत आहे.हेदेखील वाचा- नागपूरातील वाढत्या गुन्हेगारीला कंटाळलेल्या नागरिकांनी उचचले टोकाचे पाऊल, गुंडाची दगडाने ठेचून केली हत्या

पोलिसांचा तपास सुरु असून सूरजच्या गावापासून ते मुंबई नौसेना रुग्णालयातील डॉक्टरांकडून ते माहिती घेत आहेत. मरण्यापूर्वी सूरजने पोलिसांना दिलेल्या माहितीत "30 जानेवारीला त्याने सकाळी 8 वाजता रांची येथून विमान पकडले आणि रात्री 9 वाजता चेन्नई विमानतळावर उतरला. तेथे 3 अज्ञात इसमांनी त्याच्याकडून मोबाईल हिसकावून घेत त्याला एका गाडीत बसवले आणि मग 10 लाखांची मागणी केली. त्यानंतर त्याला 3 दिवस चेन्नईत ठेवले. त्यानंतर 5 फेब्रुवारीला त्याला या अज्ञात इसमांनी पालघरच्या घोलवड तहसीलजवळील जंगलात नेले. आत तेथे त्याच्या अंगावर पेट्रोल ओतून त्याला जाळण्याचा प्रयत्न केला. त्याने कशी बशी त्याची सुटका करुन घेतली. तेव्हा तेथील गावक-यांनी त्याला पाहिले आणि ते त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला."

या संपूर्ण घटनेत पोलिसांना अपहरण आणि हत्या असं चित्र दिसत असलं तरी यामागचे नेमकं कारण पोलिस शोधत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि हे अज्ञात इसम कोण होते याचा पोलिस शोध घेत आहेत.