नागपूरात (Nagpur) दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना इतक्या वाढू लागल्या आहेत की त्यामुळे नागपूरकर अत्यंत त्रस्त झाले आहेत. कितीही खबरदारी घेऊनही दिवसाढवळ्या नागपूरच्या रस्त्यांवर, गल्ली-बोळ्यात गुन्ह्याच्या घटना घडू लागल्या आहेत. या सर्वाला त्रस्त झालेल्या नागपूरकरांनी एका गुंडाचा ऑन द स्पॉटच फैसला केला आहे. News18 लोकमतने दिलेल्या माहितीनुसार, नागपूरातील नारायण पेठ (Narayan Peth) परिसरात ही घटना घडली आहे. येथील नागरिकांनी गुंडाची जागीच दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
येथील परिसरात गुंडांच्या होणा-या सततच्या त्रासाला कंटाळून नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेत एका गुंडाची जागीच दगडाने ठेचून हत्या केली आहे. ही घटना रविवारी (7 फेब्रुवारी) रात्री आठच्या सुमारास शांतीनगर मधील नारायण पेठ परिसरात घडली. विजय वाघमारे हे मृताचे नाव आहे. विजय वाघमारे हा गुंड आपल्या साथीदारांसह परिसरात हप्ता वसुली करायचा. लोकांना त्रास द्यायला. विजयवर वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत. अशाच अनेक तक्रारी त्याच्या विरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहे.हेदेखील वाचा- पालघर मध्ये दुहेरी हत्याकांड! बायकोला प्रियकरासोबत बघितले अवघडलेल्या अवस्थेत, दोघांचीही कु-हाडीने केली हत्या
रविवारी सुद्धा त्याने शांतीनगरमध्ये नागरिकांना त्रास देण्याचे काम केले. त्याच्या सततच्या त्रासाला वैतागलेल्या नागरिकांच्या संतापाच एकच कडेलोट झाला. नागरिकांनी मोठ्या संख्येनं एकत्र येत विजयवर हल्ला केला. लोकांचा संताप पाहून त्याच्या साथीदारांनी जागेवरून पळ काढला. त्यानंतर संतापलेल्या लोकांनी दगडाने ठेचून विजयचा खून केला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि लोकांच्या तावडीतून विजयची सुटका केली. तोपर्यंत तो गंभीर जखमी झाला होता. त्याला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. विजयच्या मृत्यूनंतर नारायण पेठच्या लोकांनी सुटकेचा श्वास सोडला. येथील नागरिक त्याच्या आणि त्यांच्या साथीदाराच्या अत्याचाराला त्रस्त झाले होते.
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, याच परिसरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कार्यक्रम होता. त्यांच्या कार्यक्रमानंतर हा प्रकार घडला. शांतीनगर पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळे ही घटना घडल्याचे बोलले जात आहे.